ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राज यांचे मौन 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

मुंबई - "नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकते, तर या जगात काहीही बदल होऊ शकतो,' असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर राज ठाकरे यांनी हे उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 23) विनोद दुआ यांना मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना, नरेंद्र मोदी आदी विषयांवर भाष्य केले. प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार का, अशी चर्चा रंगताना दिसते. विनोद दुआ यांनीदेखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, ""तूर्तास आम्ही एकत्र येण्याची शक्‍यता दिसत नाही; पण भविष्यात काहीही होऊ शकते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर इतके बदलू शकतात, तर भविष्यात काहीही होऊ शकते.'' 

नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी बघायला आवडेल का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर राज यांनी थेट उत्तर देणे टाळले. यंदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता येण्याची शक्‍यता कमीच आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी पक्षनेतृत्वाने नितीन गडकरी यांना संधी दिली पाहिजे ना?, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. 

नोटाबंदीने हजारो लोकांना बेरोजगार केले, बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. हे कोणते अच्छे दिन आहेत? 
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

Web Title: Raj Thackeray interview to senior journalist Vinod Dua