
इतिहासाचा वाद महाराष्ट्राला घातक, राज ठाकरेंच्या सभेवरून आव्हाडांचं वक्तव्य
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी इतिहासावर देखील भाष्य केलं. पण, राज ठाकरेंचे दावे चुकीचे आहेत, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. तसेच त्यांनी राज यांच्यावर टीका देखील केली. राज ठाकरे चुकीचा इतिहास सांगतात म्हणून मला त्यांच्यावर बोलायची वेळ येते. त्यांच्या राजकारणाबाबत तर मला बोलायचं नाही, असं आव्हाड म्हणाले.
हेही वाचा: राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'
इतिहासासोबत खेळू नका. यामधून वेगवेगळ वाद निर्माण होतात. ते वाद महाराष्ट्राला महागात पडेल. इतिहासाचा वाद राज्यासाठी घातक आहे. उगाच कोणाचा तरी उल्लेख करून कुठेही संबंध जोडायचा हे काही चांगलं नाही. आपण राजकारणात आहोत तर आपण महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी बोलुयात. आपण काय करतोय? राज ठाकरे इतिहासाचे दाखले देतात त्यावर मला बोलायचं असतं. कारण ते चुकीचे दावे करतात. बाकी त्यांच्यासोबत मला काही देणं घेणं नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आम्ही इतिहास सांगतांना इतिहासाकारांचे दाखले देतो. पण, हे कादंबरीत लिहिलेलं सांगतात. आम्हाला पुरावे आणि दाखले हवे. त्यांनी एकतरी इतिहासकाराचं नाव घेऊन दाखले द्यावे, असं आव्हाड म्हणाले. ''इतिहास जातीचा-धर्माचा नसतो. राज ठाकरेंनी औरंगाबादची लिंक ही औरंगजेबासोबत जोडली. औरंगाबादचं नाव खिरकी होतं. हे नाव मल्लिकंबर यांनी पुढे आणलं. त्याचा जन्म इथोपियात झाला होता. त्याची विक्री झाल्यामुळे तो भारतात आला. त्यावेळी सैन्य जमवून तो निजामशाहीतील राजा झाला. त्यावेळी अकबर आणि जहांगरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मल्लिकंबरने रोखलं आहे. मल्लिकंबरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांसोबत काम केलं होतं'', असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर टीका केली होती. शरद पवारांनी एकाही भाषणात छत्रपतींचा उल्लेख केला नाही. तसेच पवारांच्या राजकारणामुळे राज्यात जातीय दरी निर्माण झाली असल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केला होता.
Web Title: Raj Thackeray On Aurangabad Raj Thackeray Sabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..