आता कच खाऊ नका; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्याना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करताना मनसेने सल्लाही दिला आहे.

आता कच खाऊ नका; मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्याना सल्ला

राज्यातील दुकानांना मराठी पाट्या लावण्याबाबतचा निर्णय़ बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानंतर आता मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे. इतर कुणीही याचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करताना मनसेने सल्लाही दिला आहे. निर्णय घेतलायत तर आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी करा. मराठी भाषेची वा इतर भाषा नाम फलकावर चालतील अशी भानगड सरकारने करून ठेवली आहे. इथे फक्त मराठीच चालणार, आणि याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशाराही राज्य सरकारला मनसेनं दिला आहे.

काय म्हटलंय मनसेच्या पत्रात

ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्याचं मनसेने म्हटलं आहे.

हेही वाचा: तात्काळ बाजू मांडा; महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस

काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळानं दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेंव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. आणि महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे.

सरकारने निर्णयात इतर भाषांमध्येही नाव चालेल असं म्हटलं आहे. यावरूनही राज्य सरकारला मनसेने इशारा दिला आहे. पत्रामध्ये म्हटलं की, ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top