Loksabha 2019 : लोकसभेच्या मैदानात राज ठाकरे करताय विधानसभेची तयारी!

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 15 मार्च 2019

उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील मतभेदानंतर स्वतंत्र चूल राज ठाकरेंनी मांडली. मतदारांचा प्रतिसादही चांगला मिळाला. पण, ‘मनसे’च्या प्रगतीचा आलेख घसरतच गेला. तो सावरण्यासाठी आताची लोकसभा आणि आगामी विधानसभा या निवडणुका ‘मनसे’साठी अत्यंत कसोटी पाहणाऱ्या आहेत.

लोकसभा २०१४ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी थेट प्रचार करणारे राज ठाकरे आता मोदींविरोधात तितक्‍याच ताकदीने उतरलेत. परप्रांतीयांच्या विरोधातील त्यांची टोकाची भूमिकाही क्षीण झाली आहे, असे मोठे दोन बदल राज यांच्यात झालेत. मात्र, भूमिकेबाबतची धरसोड वृत्ती आणि त्यांच्या पक्षासाठी अवघड राजकीय स्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थान काय असेल, असा प्रश्‍न आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा राज ठाकरे यांच्याकडे येणार अशी धारणा नव्वदच्या दशकात होती, कारण एका बाजूला राज भारतीय विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करत होते, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांसोबत सावलीसारखे वावरत होते. १९९५ मध्ये बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे राजकीय पटलावर आगमन झाले. याच वेळी राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले आणि सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानला जावू लागला, उद्धव यांच्या शब्दाला आलेले महत्व आणि एकंदरच त्यांचा शिवसेनेतील वावर पाहता राज यांच्या वारसदारीला सुरुंग लागण्यास सुरवात झाली होती. १९९७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज समर्थकांना खड्यासारखे दूर केले जात होते. येथेच राज-उद्धव यांच्यातील सुरू झालेला सुप्त संघर्ष वाढत गेला. पुढे महाबळेश्‍वर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या शिबिरात पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर उद्धव यांची निवड झाली आणि राज यांना वारसदारी तर सोडाच; पण छोट्या सुभ्याची मनसबदारीही मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. दोन बंधूतील या संघर्षाचे पर्यवसान राज शिवसेनेतून बाहेर पडण्यात झाले.

विधानसभेत तेरा आमदार
राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हा राज्यभरातून सामान्य शिवसैनिक, नवमतदार आणि अगदी १४-१५ वयोगटातील मुलांना राज यांनी भुरळ घातली होती. सभांना होणारी प्रचंड गर्दी पाहता शिवसेनेला पर्याय म्हणून तरुण वर्ग आणि मराठी मतदार त्यांच्याकडे पाहत होता. परिणामी, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत लाखांच्या घरात मते घेतलेल्या ‘मनसे’चे विधानसभेत १३ आमदार निवडून आले. राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण केला.

बखर पक्षाची
९ मार्च २००६ ः ‘मनसे’ची स्थापना
विधानसभा २००९ - १४३ जागा लढवल्या, १३ जिंकल्या
विधानसभा २०१४ - २१८ जागा लढवल्या, एक जागा जिंकली
लोकसभा २००९ आणि २०१४ - लाखांच्या मतांची बेगमी, मात्र यश दूरच
२०१२ - मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील एकूण नगरसेवक - ८३

पक्षाला मिळालेले हे यश राज आणि त्यांचे शिलेदार पचवू शकले नाहीत आणि गेल्या पाच वर्षांत ‘मनसे’चा आलेख पूर्णपणे उतरला. गेल्या दोन वर्षांत राज ठाकरे पुन्हा सावरू लागले. शिवसेना आणि भाजपतील भांडणाने टोक गाठले होते आणि त्यांच्यात घटस्फोट झाला असता, तर ‘मनसे’साठी एक स्पेस निर्माण होणार होती. मात्र पुन्हा युती झाल्याने ही संधीदेखील हुकली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज यांना सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल असली तरी काँग्रेस ती रिस्क घेण्यास तयार नाही. दुसरीकडे मोदी विरोधातील मतांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी असे तीन भागीदार असताना चौथा भागीदार होऊ पाहणाऱ्या ‘मनसे’ला लोक स्वीकारतील का, हा खरा प्रश्‍न आहे. म्हणून लोकसभा न लढवता ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवायची की राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर एकमेव ‘कल्याण’ची सुभेदारी मिळवायची, असे दोन पर्याय राज यांच्यासमोर आहेत. 

१९७७ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठिंबा देत निवडणूक लढवली नव्हती, आता राज ठाकरे लोकसभा न लढवता अघोषित आणीबाणीला विरोध करून विधानसभेची पायाभरणी करतील का, असा प्रश्‍न आहे. एकूणच सद्यःस्थितीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेसारखी राज यांची अवस्था आहे.

‘‘सपना जन्मा और मर गया
मधु तु में ही बाग झर गया... राह कौन सी जाउँ मैं!’’

Web Title: Raj Thackeray is preparing for the Legislative Assembly