मनसेच्या योजनेबाबत राज उद्या बोलणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची योजना तयार असून, राज ठाकरे राज्यभरात सभा घेणार आहेत. येत्या शनिवारी (ता. ६) गुढीपाडवा मेळाव्यात ते या संदर्भात घोषणा करणार असल्याने सांगण्यात आले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची योजना तयार असून, राज ठाकरे राज्यभरात सभा घेणार आहेत. येत्या शनिवारी (ता. ६) गुढीपाडवा मेळाव्यात ते या संदर्भात घोषणा करणार असल्याने सांगण्यात आले.

मनसेने लोकसभा निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आहे. तसेच राज ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यभरात राज सहा प्रचारसभा घेणार आहेत. आपल्या आधीच्या दोन भाषणांमध्ये राज यांनी मोदीमुक्त भारत हेच आमचे ध्येय आहे असे म्हटले होते. यासाठी आता ते राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत, असे समजते.

सोलापूर, नांदेड, मावळ, सातारा, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, बारामती आणि नाशिक या ठिकाणी राज प्रचारसभा घेणार असल्याचे सांगण्यात आले. ते काँग्रेस आघाडीच्या मंचावरून प्रचार करणार की मनसेच्या मंचावरूनच करणार, याबाबत संदिग्धता आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोर भाजप-शिवसेनेचे कडवे आव्हान असेल त्या मतदारसंघात राज यांच्या सभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या  सूत्रांनी दिली.

‘...पण अशी सभा होणे नाही!’
राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची (ता. ६) सभा विक्रमी व्हावी, यासाठी आता मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शिवाजी पार्कवर गर्दी व्हावी, यासाठी मनसेचे नेते सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आज त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केलेल्या कॅम्पेनला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘निवडणुका येतात आणि जातात; पण अशी सभा होणे नाही!’ ही टॅगलाइन वापरून बनविण्यात आलेल्या या कॅम्पेनमध्ये भर देण्यात आला आहे.

Web Title: Raj thackeray will talk about MNS plan tomorrow