राजापूर पाणी योजनेचा अहवाल तयार करा - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - राजापूर (जि. रत्नागिरी) शहराची भविष्यातील पुढील 30 वर्षांची अंदाजित लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेऊन सुयोग्य ठिकाणी धरण बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना रत्नागिरी येथील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 

मुंबई - राजापूर (जि. रत्नागिरी) शहराची भविष्यातील पुढील 30 वर्षांची अंदाजित लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेऊन सुयोग्य ठिकाणी धरण बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना रत्नागिरी येथील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 

राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन धरणाबाबतची लक्षवेधी सदस्य श्रीमती हुस्नबानो खलिफे यांनी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन धरणाचे संरचनात्मक परीक्षण सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडून करून त्याबाबत अहवाल सादर केलेला आहे. 

बदलीबाबत अधिनियमात सुधारणा 
महानगरपालिकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अन्य महानगरपालिकेत बदली करण्याबाबत अधिनियमात आवश्‍यक ती सुधारणा करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करता येत नसल्याने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून गैरकामांना गती मिळत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य गिरीशचंद्र व्यास यांनी मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते. 

पुष्कर्णी सुशोभीकरणास सात दिवसांत मान्यता 

रोहा-अष्टमी नगर परिषदेने अहिल्यादेवी पुष्कर्णी तलावाचे सुशोभीकरणाचा रायगड येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर करून या प्रस्तावास सात दिवसांत मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिले. 

रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या अहिल्यादेवी पुष्कर्णी तलावाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावाबाबतची लक्षवेधी सदस्य सुनील तटकरे यांनी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. 

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेकरिता सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली असल्यास अशा दोषींवर आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

Web Title: Rajapur water scheme