राजेंद्रसिंग यांचा अनोखा "थर्टी फर्स्ट' 

तुषार खरात - सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 4 जानेवारी 2017

सिंधुदुर्ग, मुंबई - निरुपयोगी झालेल्या जाळ्या, पर्यटकांनी खाऊन टाकलेले रॅपर्स - प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या... असा कचऱ्याचा पडलेला खच आणि त्यातून पसरलेली दुर्गंधी... हे चित्र आहे, छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन केलेल्या मोऱ्याचा धोंडा या ठिकाणचे आणि खुद्द सिंधुदुर्गच्या आतील भागाचे! पण येथे साफसफाईचे कौतुकास्पद कार्य कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, त्यांच्या पत्नी अनुराधा देशमुख व जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग राणा यांनी केले. विशेष म्हणजे, या सामाजिक कार्यासाठी त्यांनी मूहूर्त निवडला होता, 31 डिसेंबरची रात्र व 1 जानेवारीची सकाळ! 

संगीताचा दणदणाट व मद्याची रेलचेल अशा वातावरणात सर्वत्र 31 डिसेंबर साजरा केला जातो. मालवणच्या समुद्रकिनारीसुद्धा काहीसे असेच चित्र होते. पण समुद्रकिनाऱ्याच्या एका कोपऱ्यात साफसफाईचे काम सुरू होते. या मान्यवरांसोबत जिल्हाधिकारी उदय चौधरी, अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वायरी गावातील नागरिक यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

मोऱ्याचा धोंडा या ठिकाणी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साफसफाई करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, 1 जानेवारीला सकाळी 7 वाजता सिंधुदुर्गमध्ये साफसफाई करण्यात आली. या वेळी देशमुख यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. "छत्रपती शिवरायांनी 25 नोव्हेंबर या दिवशी मोऱ्याचा धोंडा येथे जलपूजन केले होते, तो संदर्भ घेऊन दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी मोऱ्याचा धोंडा परिसर व सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता मोहीम केली जाईल. त्याचा आदेश आपण तत्काळ जारी करू,' असे देशमुख यांनी या वेळी सांगितले. 

गेल्या वर्षी रायगड, यंदा सिंधुदुर्ग 
देशमुख यांनी गेल्या वर्षी रायगड किल्ला व पाचाड गावात स्वच्छता मोहीम राबवून 31 डिसेंबर व 1 जानेवारी साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 500 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आणि तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंजूर केला होता. या धर्तीवर सिंधुदुर्ग किल्ल्याचाही विकास आराखडा पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधून केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Rajendra Singh's unique Thirty First