Raju Shetti I शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार; राजू शेट्टींची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी

शेतीला दिवसा वीजपुरवठा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत सरकारची घूमजाव, भूमिअधिग्रहण कायदा आणि कळीचा मुद्दा बनलेला दोन टप्प्यातील एफआयआर यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्तेत घुसमट सुरू आहे. (Raju Shetti) सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच, अशी स्वाभिमानीची (Swabhimani) मानसिकता बनली आहे. त्यामुळे स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडणार का ? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यासंदर्भातच आमदारकी मिळाली नाही तरी फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला घेतलेल्या मुलाखतीत दिली आहे.

यावेळी ते म्हणाले, पाच तारखेच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारकडून सर्वच पातळीवर निराशा झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार असल्याची भूमिकाही घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे. कार्यकारीच्या निर्णयानंतर माझा वैयक्तिक निर्णय येईल त्यासाठीच या बैठकीचे आयोजन केले असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, भाजपच्या सगळ्याच योजना नाव ठेवण्यासारख्या नाहीत. जिल्हा बँका या शेतकऱ्यांच्या बँका असून यामध्येही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून भ्रष्टाचार सुरु आहे. दरोडा घालणारे हे नेते सर्वपक्षीय आहेत. अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू असतात आणि इकडे भ्रष्टाचार हे यांचे सुत्र आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. या कार्यकारीणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत याविषयी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता स्वाभिमानी शेतकरी संघटना या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेणार यावर स्वाभिमानीचे पुढचे भवितव्य अवलंबून असणार आहे.