अण्णांची आंदोलने दिसणार "सीडी' संचातून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

राळेगणसिद्धी - आतापर्यंत केलेली सर्व आंदोलने, देशभरात केलेले दौरे आणि राळेगणसिद्धीतील पाणलोट विकासाचे काम "सीडी'मध्ये एकत्रित करण्यात येत आहे. त्या ध्वनिचित्रफितींचा संच लवकरच प्रकाशित करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी "सकाळ'ला सांगितले.

राळेगणसिद्धी - आतापर्यंत केलेली सर्व आंदोलने, देशभरात केलेले दौरे आणि राळेगणसिद्धीतील पाणलोट विकासाचे काम "सीडी'मध्ये एकत्रित करण्यात येत आहे. त्या ध्वनिचित्रफितींचा संच लवकरच प्रकाशित करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी "सकाळ'ला सांगितले.

पंधरा मिनिटांची एक अशा चाळीस ते पन्नास सीडी त्यात असतील, अशी माहिती देऊन हजारे म्हणाले, ""मी सैन्यात कसा गेलो, गावाचा विकास कसा केला, त्यात काय अडचणी आल्या, त्या कशा सोडविल्या, माहितीचा अधिकार, "राइट टू रिजेक्‍ट', "राइट टू रिकॉल', लोकपाल व लोकायुक्त कायद्यासाठी केलेली आंदोलने, देशभरातील दौरे, व्यसनमुक्ती, पर्यावरण, ग्रामविकास, पाणलोट या सर्वांसाठी मला प्रेरणा कशी मिळाली, या सर्व बाबी ध्वनिचित्रबद्ध करण्यात येत आहेत. मी केलेल्या या सर्व गोष्टी काल्पनिक नसून, प्रत्यक्ष कृती आहे, हे जनतेला समजावे, असा उद्देश आहे. या सर्व ध्वनिचित्रफिती यू-ट्यूब आणि फेसबुकवरही अपलोड करण्यात येतील.''

राहुल गांधी यांच्यात प्रगल्भता नाही
सरकारविरोधात कितीही मोठी आंदोलने केली, तर कदाचित सरकार बदलेल आणि दुसरे येईल; परंतु भ्रष्टाचार थांबणार नाही. त्यामुळे केवळ सरकार बदलून चालणार नाही, तर चांगली माणसे सरकारमध्ये येणे गरजेचे आहे, असेही हजारे म्हणाले. त्यासाठी निवडणुकीतून पक्ष व चिन्हांना हद्दपार करण्याची गरज असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात आतापेक्षाही अधिक भ्रष्टाचार होता, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यात अजून प्रगल्भता आली नाही. राजकारणात दृष्टी असावी लागते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पक्ष मजबूत करण्याचेच मोदींचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना हजारे म्हणाले, ""त्यांचे सरकार देशातील भ्रष्टाचार संपविण्याच्या मुद्द्यावर निवडून आले; मात्र ते आश्‍वासने पूर्णपणे विसरले. त्यांना देशाचे काही घेणे-देणे नाही. आपला पक्ष मजबूत करण्याचेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.'' "जीएसटी' लागू करताना सरकारने पेट्रोल व डिझेल त्यातून जाणीवपूर्वक वगळले. कारण त्यातून त्यांना फायदा मिळत आहे. आपल्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर पाकिस्तानपेक्षाही दुप्पट आहेत. म्हणूनच जनजागृतीसाठी देशभर दौऱ्याचा आणि आंदोलनाचा निर्णय घेतला आहे, असेही हजारे म्हणाले.

Web Title: ralegansiddhi maharashtra news anna agitation in cd