चारित्र्य, श्रमाचे प्रशिक्षण नेत्यांनाही द्यावे - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

राळेगणसिद्धी - फक्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन देशाची प्रगती होणार नाही, त्यासाठी नेत्यांना नेतृत्वाचे, चारित्र्य शुद्ध ठेवण्याचे, स्वच्छता आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यातूनच खेड्यांचा व पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

राळेगणसिद्धी - फक्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन देशाची प्रगती होणार नाही, त्यासाठी नेत्यांना नेतृत्वाचे, चारित्र्य शुद्ध ठेवण्याचे, स्वच्छता आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यातूनच खेड्यांचा व पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर मोठे काम करत आहेत; मात्र देशातील खेड्यांचा विकास थांबला आहे. याबाबत मोदी यांना लवकरच पत्र पाठविणार असून, त्यात खेड्यांचा विकास थांबल्याची कारणेही कळविणार असल्याचे सांगून हजारे म्हणाले, ""देशाच्या व खेड्यांच्या विकासासाठी नेतेमंडळींना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. केवळ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन चालणार नाही आणि केवळ अधिकाऱ्यांनाच दोषी ठरवूनही चालणार नाही. खेड्यांच्या मागासलेपणासाठी नेतेमंडळीही जबाबदार आहेत. खेड्यांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण असते, तसे नेत्यांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी विधानसभा व लोकसभेने "नेतृत्वविकास प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. प्रत्येक खेड्यात किमान चार ते पाच "लीडर' तयार होणे गरजेचे आहे.''

'मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान फक्त छायाचित्रांपुरते दिसते. स्वच्छता करताना छायाचित्रे काढली जातात व नंतर ते काम थांबते. छायाचित्रासाठी काम करून चालणार नाही. नेत्यांनी दररोज किमान एक तास श्रमदान केले पाहिजे. राजकारण्यांना दररोज एक तास हातात झाडू घेण्यास भाग पाडले पाहिजे, म्हणजे त्यांना श्रमाची लाज वाटणार नाही. त्यांना स्वच्छ चारित्र्याचेही प्रशिक्षण हवे. तसे झाले तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही,'' असे हजारे म्हणाले.

'सकाळ'ने आदर्श निर्माण केला'
महिलांसाठी "तनिष्का' व तरुणांसाठी "यिन' यासारखे उपक्रम "सकाळ'ने सुरू केल्याबद्दल हजारे यांनी प्रशंसा केली. केवळ बातम्या देण्यापुरते काम न करता समाजप्रबोधन व महिला आणि तरुणांसाठी विविध उपक्रम राबवून "सकाळ'ने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: raleganssiddhi maharashtra news Charity, training of labor leaders should also be given to them