
आनंद महिंद्रांनी पाळला शब्द,'मदर्स डे'ला 'इडली अम्मा'ला दिले नवीन घर
मुंबई : तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या १ रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला स्वतःचे नवीन घर मिळाले आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी जे वचन दिले होते, ती आता मातृदिनी पूर्ण झाले आहे. 'इडली अम्मा' या नावाने प्रसिद्ध तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम.कमलाथल (M.Kamalathal) यांनी आपल्या जीवनातील अनेक हिवाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्या आपल्या भागात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि इतर लोकांसाठी केवळ एका रुपयात इडली विकतात. इडली अम्माला त्यांना नवीन घर मिळाल्याची माहिती स्वतः महिंद्रा अँड महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन दिली आहे. ते म्हणतात, मातृदिनी (Mothers Day) इडली अम्माला भेट देण्यासाठी घर वेळेत बांधून दिल्याबद्दल आमच्या टीमचे खूप-खूप आभार ! त्यांच्यात एका आईचे गुण - पोषण, देखभाल आणि निःस्वार्थ भावास मूर्त रुप देत आहे.
त्यांना आणि त्यांच्या कामाला पाठिंबा देण्यास संधी मिळाल्याने आम्ही स्वतःला उपकृत समजतो. सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा ! आनंद महिंद्रा यांनी ट्विटबरोबर व्हिडिओही शेअर केला आहे. यात इडली अम्मा आणि महिंद्रा यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली हे सांगण्यात आले आहे. वास्तविक आनंद महिंद्रा यांनी १० सप्टेंबर २०१९ मध्ये इडली अम्माचा (Idli Amma) एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी ते म्हणाले, इडली अम्माच्या उद्योगात गुंतवणूक करणे आणि त्यांना चुलीऐवजी गॅस स्टोव्ह देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जेव्हा महिंद्रा यांची टीम इडली अम्माला भेटायला पोहोचल्या तेव्हा त्यांनी एक नवीन घर मिळण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यांच्या या इच्छेचा आदर करत आनंद महिंद्रा यांनी त्यांच्यासाठी नवीन घर बनवून देण्याचा शब्द दिला. महिंद्रा लाइफ स्पेसेजने यावर ताबडतोब काम करण्यास सुरुवात केले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या घराच्या बांधकामासाठी जमिनीची नोंदणी झाली होती. आज मातृदिनी इडली अम्माला स्वतःचे नवीन घर मिळाले. यात एक विशेष किचनही आहे.