खुद्द पर्यावरणमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्लॅस्टिकचे गुच्छ

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

- प्लॅस्टिकचे गुच्छ देण्यात आल्याने संतापले पर्यावरणमंत्री.

सेलू (परभणी) : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात प्लॅस्टिकबंदीची कारवाई करण्यात येत आहे. या प्लॅस्टिकबंदीचे आदेश देणाऱ्या खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाच एका कार्यक्रमात प्लॅस्टिकचे गुच्छ देण्यात आले. या प्रकारानंतर रामदास कदम यांचा पारा आणखीनच चढला. 

सेलू येथे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रामदास कदम यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. कदम आणि खोतकर यांचे स्वागत करण्यासाठी संयोजकांनी प्लॅस्टिकमधील पुष्पगुच्छ समोर आणले. प्लॅस्टिकचे पुष्पगुच्छ पाहताच कदम यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यांनी उपस्थित तहसीलदार बालाजी शेवाळे यांना चांगलेच धारेवर धरले.

त्यावेळी कदम यांनी राज्य शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. पर्यावरणासाठी आम्ही एवढे काम करीत असताना तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करताय, हे प्लॅस्टिक येते कोठून? अशा प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार अधिकाऱ्यांना सहन करावा लागला.

दरम्यान, रामदास कदम यांच्या या कार्यक्रमाची चर्चा तालुक्यासह परभणी जिल्ह्यात झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Kadam angry after get Plastic Bunch of Flowers