रामदास कदम - चंद्रकांत पाटील यांच्यात जुगलबंदी

रामदास कदम - चंद्रकांत पाटील यांच्यात जुगलबंदी

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्‍यता संपुष्टात आल्याचे चित्र असतानाच दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये खडाखडी सुरू आहे. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्‍तव्यावर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आज शाब्दिक जुगलबंदी रंगली. ‘आम्हाला पटकावणाऱ्यांना आम्ही गाडू,’ असा इशारा कदम यांनी दिला, तर लोकशाहीत कुणाला काहीही बोलण्याचा अधिकार असल्याचे सबुरीचे विधान पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात युती होणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा स्पष्ट केले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते अद्यापही आशावादी आहेत. मात्र, गेल्या महिन्यात अयोध्येतील उद्धव यांच्या कार्यक्रमानंतर युतीमध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच, २४ नोव्हेंबर २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमातही उद्धव यांनी पंतप्रधानांसह शहा यांचा शेलक्‍या शब्दांत समाचार घेतला होता. गेल्या रविवारी शहा आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत लातूर येथे भाजपचा मेळावा झाला. या मेळाव्यात शहा यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला. ‘आमच्या सोबत आल्यास मित्रपक्षांच्या जागा निवडून आणू; नाही तर पटक देंगे,’ असे विधान शहा यांनी केले होते. या वक्तव्याला त्याच दिवशी उद्धव यांनी प्रत्युत्तरही दिले होते.

...तर भाजपला धोबीपछाड देऊ
शहा यांच्या टीकेनंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र कुस्तीचे राज्य म्हणून ओळखले जाते, आमच्या नादाला लागाल तर धोबीपछाड देऊ,’ असा इशारा दिला आहे. शहा यांच्या वक्‍तव्याचे शिवसेनेत अद्यापपर्यंत पडसाद उमटत असतानाच आज त्यात आणखी एक ठिणगी पडली. शिवसेना नेते रामदास कदम यांनी शहा यांना नव्याने इशारा दिला. ‘आम्हाला पटकावण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही गाडून टाकू,’ असे कदम म्हणाले. यावर महसूलमंत्री पाटील यांनी मात्र सबुरीचे विधान करीत प्रतिक्रिया दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com