राष्ट्रवादीचे आणखी एक ज्येष्ठ नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.

उस्मानाबाद : आपल्या भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांना पाणी, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी सर्वांना बरोबर घेऊन सामर्थ्य वाढवायचे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी (ता.31) केली. 

आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. येथे समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. माजी मंत्री पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले, "ज्येष्ठ नेते शरद पवार आपले दैवत आहे, यापुढेही राहील. हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे. हा निर्णय घेताना आपण सगळेच भावनाविवश झालो आहोत.'' 

आजवर कार्यकर्त्यांनी मला मोठी साथ दिली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. राणाजगजितसिंह यांनाही अशीच साथ द्याल, अशी अपेक्षा. 
- डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rana Jagjit Singh Join BJP Soon