3 लाख विषारी गोळ्या, उंदिर नाही; सरकारचे  स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

अंदाजपत्रक आणि निविदेत नमूद संख्या ही या कामांतर्गत संपूर्ण मंत्रालय इमारत व परिसरात ठेवलेल्या ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्यांची असून, ती संख्या मारलेल्या उंदिरांची नाही असे सांगतानाच हे काम केवळ सहा दिवसात पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

मुंबई : मंत्र्यालयातील उंदिर घोटाळ्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केल्यानंतर सरकारची सर्वत्र बेअब्रु झाल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांचे खुलासे देताना दमछाक होत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या खुलाशा नंतर आज विधानसभेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत निवेदन करून ३ लाख १९ हजार ४०० ही विषारी गोळ्यांची संख्या असून ती मारलेल्या उंदिरांची नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.

मंत्रालयातील महत्त्वाच्या नेटवर्कच्या केबल सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने शाॅर्ट सर्किट होऊ नये नये याकरीता, विद्युत तारांचे संरक्षण करण्यासाठी मंत्रालय मुख्य इमारत, विस्तारीत इमारत आणि मंत्रालय आवारात उंदिर निर्मुलनाकरिता “जहरी गोळ्या” टाकण्याचे काम १९८४ पासुन हाती घेण्यात आले आहे.हे काम विनायक मजूर संस्थेला देण्यात आले असून, अंदाजपत्रक आणि निवेदनानुसार उंदिर निर्मूलनाकरीता ३ लाख १९ हजार ४०० एवढ्या गोळ्या पुरविण्यात आल्या. यावरून हे काम उंदिर मारण्याचे नसून, उंदिर निर्मुलनाकरीता केलेल्या उपाययोजनेचे असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

अंदाजपत्रक आणि निविदेत नमूद संख्या ही या कामांतर्गत संपूर्ण मंत्रालय इमारत व परिसरात ठेवलेल्या ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्यांची असून, ती संख्या मारलेल्या उंदिरांची नाही असे सांगतानाच हे काम केवळ सहा दिवसात पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Web Title: rat scam in maharashtra, government clarifies in vidhan sabha