जामगावचे रवींद्र खंदारे करणार 'निपुण भारत'साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवींद्र खंदारे
जामगावचे रवींद्र खंदारे करणार 'निपुण भारत'साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

रवींद्र खंदारे करणार 'निपुण भारत'साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

मळेगाव (सोलापूर) : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 'निपुण भारत' (Nipun Bharat) योजना मूलभूत व साक्षरता (Literacy) व संख्याज्ञान कौशल्य वाढविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या शैक्षणिक कार्यगटात सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी तथा जामगावचे (पा) (ता. बार्शी) सुपुत्र रवींद्र खंदारे (Ravindra Khandare) यांची निवड झाली आहे. दिल्ली (Delhi) येथे होणाऱ्या कार्यशाळेत रवींद्र खंदारे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राचा (Maharashtra) बहुमान वाढला आहे.

हेही वाचा: तरुणांमधील स्किल डेव्हलपमेंटसाठी 'गूगल करिअर सर्टिफिकेट' लॉंच!

जामगावसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले रवींद्र खंदारे 'निपुण भारत'साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत, हे समजताच सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. रवींद्र खंदारे यांचे माध्यमिक शिक्षण कर्मवीर ना. मा. गडसिंग गुरुजी मित्र विद्यालय, मळेगाव येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी येथे झाले आहे. शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी येथे त्यांनी डीएडची पदवी पूर्ण केली आहे. पुढे एमए, एमएड, सेट-नेट अशा विविध पदव्या त्यांनी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केल्या आहेत. 1998 साली ते करमाळा तालुक्‍यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानंतर 2009 ला सातारा जिल्ह्यातील जावळी येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

पुढे 2014 साली कराड येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली. रवींद्र खंदारे कराड येथे गटशिक्षणाधिकारी असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण स्वच्छ सुंदर शाळा ग्राम स्पर्धा यशस्वीपणे राबवली. याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने गौरविण्यात आले. बालभारतीच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या लेखनासाठी त्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने केंद्र संमेलन शिक्षक मार्गदर्शिका लेखनामध्ये त्यांचा सहभाग होता. मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञानाविषयी केलेल्या अभ्यासामुळे त्यांची निवड झाली आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

रवींद्र खंदारे यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्राशी असलेली बांधिलकी विविध समाजोपयोगी कार्याद्वारे जोपासली आहे. ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी जामगाव येथे ऋणानुबंध फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रंथालयाची उभारणी केली आहे. तसेच विविध सामाजिक कार्यातून गावाशी जोडलेली नाळ अधिकच घट्ट केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, ऋणानुबंध फाउंडेशन तसेच जामगाव (पा) ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

loading image
go to top