साखर कारखान्यांना पश्‍चात्ताप

ज्ञानेश्वर रायते
शुक्रवार, 8 जून 2018

भवानीनगर - साखरेची घाऊक विक्रीची किंमत २९ रुपयांच्या खाली आणायची नाही, असे बंधन आता थेट केंद्र सरकारनेच घातल्याने साखरेच्या दराला ६० वर्षांनंतर पहिल्यांदाच एक किमान दर पातळी आली. बुधवारी साखरेचे दर २७५० रुपयांवर पोचले होते, आज ते २९०० रुपयांवर पोचले. अर्थात या निर्णयापूर्वीच मागील केवळ दहा दिवसांत जिल्ह्यातील कारखान्यांनी तब्बल ४ लाख पोती साखर बाजारात अवघ्या प्रतिक्विंटल २३५० ते आठवड्याच्या शेवटी २६०० रुपयांपर्यंत विकल्याने कारखान्यांना किमान १२ ते कमाल २४ कोटींचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कारखान्यांनी मागील दहा दिवसांत ५० हजार पोत्यांपासून ते सव्वा लाख पोत्यांपर्यंत साखर बाजारात विकली. ही साखर अगदी २३६० रुपयांपासून ते कमाल २६०० रुपयांपर्यंत विकली गेल्याने कारखान्यांना एका पोत्यामागे किमान ३०० ते कमाल ६०० रुपयांचा फटका बसला. कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने साखर विक्रीच्या बैठका घेऊन ही साखर विकल्याने बहुतेक सर्वच कारखान्यांना   कमी अधिक प्रमाणात हा किमान व कमाल फटका बसला आहे. साहजिकच आज साखरेचे भाव किमान पातळीवर पोचल्याने या कारखान्यांवरही पश्‍चात्तापाची वेळ आली. तरीही त्या स्थितीत घेतलेला निर्णय योग्यच होता असे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले; परंतु केंद्र सरकार असा निर्णय घेणार असल्याची माहिती साखर कारखान्यांपर्यंत पोचली होती, असा सूर आता विरोधातून येऊ लागला आहे. 

राज्यातील बहुतेक कारखान्यांनीही साखर कमी दराने विकली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना सरासरी ३५० ते ६०० रुपये प्रतिपोत्यामागे फटका बसलेला आहे. त्याचा थेट परिणाम ऊसउत्पादकांवर येत असल्याने संचालक मंडळाला त्याचे देणेघेणे नसावे. खरेतर संचालक मंडळ विश्वस्त असते. त्यांनी भविष्याचा विचार करून साखर विक्रीचे निर्णय घ्यायला हवेत. २३५० रुपये हा काही साखरेचा दर बसू शकत नाही हे माहिती असूनही तेवढ्या दराने लाखो पोती बाजारात काढणे हा अवसानघातकीपणा आहे.
- पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, राज्य साखर संघ 

साखर कमी दरात विकून साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी बंधपत्राचा नियम मोडला आहे. त्यामुळे संचालक मंडळांवरच फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. आम्ही गेली अनेक वर्षे साखर उत्पादन खर्च व किमान नफ्याच्या खाली विकू नका असा आग्रह करीत होतो. साखर कारखाने कशा बेभरवशाने काम करतात हे यातून दिसते.
- पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

४ लाख पोती विक्री
कालावधी १० दिवस
दर २३५० ते २६०० रुपये

Web Title: Repentance to sugar factories