नोटाबंदीच्या तपशिलाबाबत रिझर्व्ह बॅंकच अनभिज्ञ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - देशभरात नोटाबंदीचा निर्णय तडकाफडकी राबवून नागरिकांना "सळो की पळो' करून सोडणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेकडे नोटाबंदीशी संबंधित कार्यवाहीच्या नियमांचा तपशीलच उपलब्ध नाही. तो कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, हेसुद्धा रिझर्व्ह बॅंकेला माहीत नाही, असे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून (आरटीआय) उघड झाले आहे. 

दिवाळीनंतर देशात झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच दररोज नवी बंधने आणि नव्या घोषणा करून रिझर्व्ह बॅंकेने नागरिकांना नव्या नोटा देण्याबाबत अनेक प्रकारे आर्थिक गोंधळ निर्माण केला होता. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी रिझर्व्ह बॅंकेकडे नोटाबंदीचा एकूणच सर्वंकष आढावा घेणारा तपशील माहिती अधिकाराच्या अर्जाद्वारे मागितला होता. यामध्ये 1978 पासून नोटाबंदीबाबत घेण्यात आलेल्या नियमांचा तपशील आणि या तपशिलाची माहिती कोणत्या संकेतस्थळावर मिळेल, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर "विभागाकडे ही माहिती उपलब्ध नाही' असे देण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर एकूण किती नव्या नोटा छापण्यात आल्या आणि त्यात पाचशे व दोन हजारच्या किती नोटा होत्या, याचाही तपशील उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यनिहाय किती नव्या नोटांचा पुरवठा बॅंकांना करण्यात आला याचाही तपशील माहीत नसल्याची कबुली या उत्तरात दिलेली आहे. 

मृत्युमुखी पडलेल्यांचीही दखल नाही 
नोटाबंदीनंतर पैसे काढण्यासाठी एटीएमच्या रांगेत उभे असलेले किती नागरिक मृत्यू पावले, याची दखलही रिझर्व्ह बॅंकेने घेतलेली नाही. किती जणांचा मृत्यू झाला, किती जण गंभीर आजारी झाले, किती तक्रारी बॅंकेकडे आल्या याचीही आकडेवारी आमच्याकडे नाही, असे उत्तर रिझर्व्ह बॅंकेने दिले आहे.

Web Title: The Reserve Bank is unaware of the details about notabandi