
2024 नंतरच्या राजकारणाची सूत्र आपल्याकडेच, विधानावर रोहित पवारांचं स्पष्टीकरण
मुंबई : पुढील काळातील राजकारणाची सूत्र ही आपल्याच हाती असतील असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी केलं होत. ते जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. मात्र त्यांच्या विधानावरून वाद झाला असून त्यावर आता रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Rohit Pawar news in Marathi)
आम्ही कायम जमिनीवरच राहणार आहोत. जमिनीवर राहण्याची मागच्या पिढीची शिकवण स्वीकारुन ती आत्मसात केली आहे. 2024 पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहोत. मात्र, 2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपणच घेणार, यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच पण निर्णय मात्र नवीन पिढीचे रहाणार आहेत, असं रोहित पवारांनी म्हटलं होतं.
अहमदनगर येथे आज एका कार्यक्रमात असताना रोहित पवार यांनी आपल्या जुन्नर येथे केलेल्या विधानावर म्हटलं, जे मनामध्ये असतं ते मी बोलतो. त्यावेळी बोलताना मी युवकांची बाजू घेतली. तसेच पवार साहेब किंवा दादा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी असतात. मात्र येत्या काळाता पक्षाने युवकांना महत्त्व आणि शक्ती देऊन गरज, असल्याचं मी बोललो. त्यावेळी मी रोहित पवार नावाची टिमकी वाजवली नसल्याचं पवार यांनी म्हटलं. दरम्यान कुणी माझ्या वक्तव्याचा दुसरा अर्थ काढला असेल तर मी आता खरा अर्थ सांगितल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.
राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही मात्र या महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मात्र, लांबचं राजकारण करत असताना सहकारी मित्रांना कधीच विसरणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी पुढची राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्र आपल्याच हाती येणार असल्याचे संकेतच दिले होते.