विखंडतेचा शाप!

Babasaheb-Ambedkar
Babasaheb-Ambedkar

भंडारा जिल्ह्यातील १९५४ मधील पोटनिवडणुकीतील पराभवाने अस्पृश्‍यवर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत, ही बाबासाहेबांची समजूत पक्‍की झाली. त्यानंतर १९५६ मध्ये त्यांनी ‘अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षा’ची घोषणा केली. मात्र, घोषणेनंतर दोन महिन्यांतच बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष भारतीय राजकारणाच्या व्यासपीठावर अवतरलाच नाही... 

जातिव्यवस्था आणि भांडवलशाही यांच्याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढत असतानाच त्यांनी भारताची संसदीय व्यवस्था उभी करण्यात मोलाचे योगदान दिले; मात्र त्यांनी स्वत:च्या नावाने कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना केली नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर १० महिन्यांनी १९५७ मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर वर्षभरातच पक्ष फुटला. त्यातून बाहेर पडलेला गट ‘दुरुस्त रिपब्लिकन पक्ष’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘दलितांचे जितके नेते, तितके गट’ अशीच स्थिती सध्या आहे.  

२०१४ मध्ये सतराहून अधिक नोंदणीकृत नसलेल्या आंबेडकरवादी पक्षांनी विधानसभेची निवडणूक लढवली. यांपैकी एक-दोन पक्षांनाच एकूण मतदानापैकी साडेतीन ते चार टक्‍के मतदान झाले. निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या दोनपेक्षा अधिक नाही. सतरापैकी तीन गटांची नोंद ही त्यांच्या नेत्यांच्या नावाने आहे. समतेचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांची धुरा पुढे घेऊन जाणारे त्यांच्या विचारांपेक्षा मोठे झाले. पक्षापेक्षा गटच वाढत गेले. रिपब्लिकन पार्टी (आठवले), प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय बहुजन महासंघ म्हणजेच आजची वंचित बहुजन आघाडी आणि कवाडे गट, खोब्रागडे गट, कांबळे गट यांची नोंद घ्यायला हवी. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लॅण्ड मॉर्गेज बॅंका, कृषी उत्पन्न बाजार सहकारी सोसायट्या स्थापन करणे, प्रौढ शिक्षणाचा प्रसार, शिक्षणव्यवस्थेची पुनर्रचना, अस्पृश्‍यवर्गाचा आर्थिक-सामाजिक, सांस्कृतिक प्रश्‍न सोडवण्यासारखे कार्यक्रम पक्षाने हाती घेतले होते. श्रमिकांच्या आणि अस्पृश्‍यांच्या प्रश्‍नांवर डॉ. आंबेडकरांनी याकाळात तीव्र लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ मध्ये अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. १९४६ च्या प्रांतिक निवडणुकीत मात्र फेडरेशनचा पराभव झाला. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार एन. एस. काजरोळकर यांनी बाबासाहेबांचा पराभव केला. त्यानंतर १९५४ मध्ये भंडारा जिल्ह्यातील पोटनिवडणुकीतही राखीव जागेवर बाबासाहेबांचा पराभव झाला होता. या दोन्ही पराभवांची कारणे वेगवेगळी असली, तरी अस्पृश्‍यवर्गातील उमेदवारांना इतर लोक मते देत नाहीत, ही बाबासाहेबांची समजूत पक्‍की झाली. त्यानंतर १९५६ मध्ये त्यांनी ‘अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षा’ची घोषणा केली; मात्र घोषणेनंतर दोन महिन्यांतच बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष भारतीय राजकारणाच्या व्यासपीठावर अवतरलाच नाही.

बाबासाहेबांना स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या त्यांनी लढवलेल्या पहिल्या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या आलेल्या अनुभवामुळे काँग्रेसविरोधात राजकारण करावे लागणार हे स्पष्ट झाले होते; मात्र १९६२ पासून नंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांनी सत्ताधारी काँग्रेसशी जुळवून घेण्याची भूमिका कायम ठेवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com