
Mohan Bhagwat : 'त्या' काळात भोसले घराणं संघाशी संबंधित होतं; RSS प्रमुख भागवतांचं मोठं विधान
नागपूर : जगातील चांगल्या देशांकडं अनेक कल्पना आहेत. एक विचारधारा किंवा एक व्यक्ती देश घडवू किंवा तोडू शकत नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
राजरत्न पुरस्कार समितीनं आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, 'एक व्यक्ती, एक विचार, एक विचारधारा देश घडवू किंवा तोडू शकत नाही. जगातील चांगल्या देशांकडं सर्व प्रकारच्या कल्पना असतात. त्यांच्याकडं सर्व प्रकारची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था घेऊनच ते पुढं जात आहेत.'
नागपूरचे पूर्वीचे राजघराणे असलेल्या भोसले कुटुंबाबाबत (Bhosale Family) आरएसएस प्रमुख म्हणाले, संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या काळात हे कुटुंब संघाशी संबंधित होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) 'स्वराज्य' स्थापन केलं आणि त्यांच्या काळात दक्षिण भारत अत्याचारापासून मुक्त झाला. त्याच वेळी नागपूरच्या भोसले घराण्याच्या राजवटीतही पूर्व आणि उत्तर भारत अत्याचारातून मुक्त झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.