कुंपणच खातंय शेत ! RTO तील अधिकाऱ्यांकडूनच राज्याच्या महसूलाची चोरी...

प्रशांत कांबळे
Tuesday, 28 July 2020

सोलापूर आरटीओ कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मुंबई : कोरोनाच्या काळात आधीच राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना, आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांकडून 35 लाख रूपयांपेक्षा जास्त महसुलांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागात पुढे आला आहे. येथील अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून वायुवेग पथक आणि ओव्हरलोड वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईतील गेल्या वर्षभरातील दंडाची रक्कमच लंपास केल्याची तक्रार राज्याचे परिवहन अपर मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. 
 
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामूळे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामूळे आरोग्य सुविधा पुरविताना राज्य सरकारला आर्थिक अडचण येत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असून, फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामूळे राज्याच्या महसूलावर सुद्धा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नुकतेच राज्य सरकारने महसुल मिळविण्यासाठी लाॅकडाऊन शिथील केला आहे. मात्र, त्याचाही फायदा प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारीच घेतांना दिसून येत आहे. 

मोठी बातमी - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ घोटाळा : मुंबई आणि हैद्राबादसह नऊ ठिकाणी ED ची छापेमारी

सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकारी कार्यालयात असाच एक प्रकार पुढे आला असून, अधिकाऱ्यांच्या संगणमताने गेल्या वर्षाभरातील महसूलावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये रस्त्यांवरील वाहनांची तपासणी करून वसूल केलेला दंड आणि कर शासनाच्या तिजोरीत भरण्याऐवजी अधिकाऱ्यांनीच लंपास केला आहे. सुमारे 35 लाखांपेक्षा जास्त हा महसुल असून, तर वायुवेग पथकाने ओव्हरलोड वाहनांकडून दंड वसूल केलेले दस्तावेज सुद्धा गायब असल्याचा तक्रारीत आरोप केला आहे. 

वायुवेग पथक, ओहरलोड गाड्यांच्या वर्षभराचा दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली नाही. त्यामूळे शासनाच्या महसूलाची चोरी करणे आणि प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यासाठी एआरटीओने आता फौजदारी गुन्हा दाखल करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करावे, त्यासोबतच त्रयस्त यंत्रणेकडून प्रकरणाची सखोल चौकशी करावी असं याप्रकरणातील तक्रारदार महादेव साहेबराव खरसाडे यांनी म्हटलंय. 

हेही वाचा : कोरोनामुळे ८१ वर्षीय बिल्डरचा झाला मृत्यू, शफिकने चालवली शैतानी खोपडी आणि आखला एक प्लॅन...

तर याबाबत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, संजय डोळे यांनी म्हटलंय की,  ओव्हरलोड केसेस वायुवेग पथकाकडून केली जाते. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पथकाचे प्रमूख असतात. त्यातील सर्वेक्षणाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच असते. यामध्ये आतापर्यंत वाहनांच्या ओव्हरलोड कारवाईमधील दंड कमी भरलेला कुठेही आढळून आलेला नाही.

कल्याण RTO तील महसूल चोरी प्रकरण ताजे

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथील नायर प्रकरण ताजेच आहे. ओव्हरलोड वाहन करामध्ये सुमारे दिड कोटी पेक्षा जास्त महसुलाची चोरी करण्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले होते. त्यानंतर याप्रकरणी परिवहन विभागाने चौकशी समिती नेमली होती. तर ऑडिटसुद्धा करण्यात आलं होतं. त्याचा अहवाल सध्या राज्य परिवहन विभागाला सुपूर्द करण्यात आला असून, अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

RTO officers are doing fraud in solapur RTO read detail report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO officers are doing fraud in solapur RTO read detail report