
Rudraksh Mahotsav Sehore : रुद्राक्ष महोत्सवात गोंधळ! बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता
Rudraksh Mahotsav Sehore 2023 : महाशिवरात्रीच्या निमीत्ताने मध्य प्रदेशातील सिहोरमधील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी परिस्थिती अनियंत्रित झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.
यावेळी भाविकांनी मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी अलोट गर्दी केल्याने एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी देशभरातून लाखो लोक जमा झाले आहेत. वाहनांच्या वीस किलोमिटरहून अधीक रांगा लागल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातून देखील हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. याठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने गर्दीत महाराष्ट्रातील या भाविक महिलांशी संपर्क तुटला आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील लोक सध्या बेपत्ता असल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत.
तीन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांकडून खामगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. सिहोरला गेलेल्या या महिलांशी कुठलाही संपर्क होत नसल्याते या तक्रारीत नातेवाईकांनी सांगितलं. या महिला वाडी, सुटाळा खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.