शिक्षकांच्या बदल्या होणार, पण...; काय म्हणाले हसन मुश्रीफ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

मागील दोन वर्षांत गैरसोय झालेल्या शिक्षकांना कोणतेही प्राधान्य मिळत नसल्याने राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोयीच्या बदल्यांची मागणी केली होती.​

बारामती : यंदाच्या वर्षी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या फक्त सोयीच्या बदल्या केल्या जातील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात मध्यस्थी करीत काही सूचना केल्या होत्या, त्यामुळे हा निर्णय झाल्याचे मारणे म्हणाले. कोल्हापूर येथे मुश्रीफ आणि प्राथमिक शिक्षक संघ यांच्यात बैठक झाली, त्यात हा निर्णय मुश्रीफ यांनी जाहीर केला. 

राज्य शासनाने ३१ जुलैपूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना दिले होते, मात्र मागील दोन वर्षांत गैरसोय झालेल्या शिक्षकांना कोणतेही प्राधान्य मिळत नसल्याने राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोयीच्या बदल्यांची मागणी केली होती.

सरळ सेवा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार? अधिकारी काय म्हणाले पाहा​

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार यांच्यातील चर्चेनंतर राज्य प्राथमिक शिक्षक संघास चर्चेसाठी कोल्हापूर येथे निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत विस्थापित, रॅण्डम राऊंड, समानीकरण, आंतरजिल्हा बदली झालेले, पती-पत्नी, एकल या सर्व शिक्षकांच्या सोयीने विनाअट विनंती बदल्या करण्याची मागणी करण्यात आली.

सर्वांची मूळ तालुक्यात बदली झाल्यानंतर पुढील वर्षीसाठी सर्वसमावेशक बदली धोरण तयार करण्याची मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. या बैठकीस शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबरे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, चंद्रकांत यादव, संतोष देशपांडे यांच्यासह राज्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना लढ्यासाठी 'महाविकास आघाडी'नं दिले फक्त तीन कोटी; वाचा कुणी केला आरोप?​

राज्यातील शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे , बदली धोरणात आवश्यक बदल केले जातील.
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

शिक्षक संघाच्या मागण्या :
•    विस्थापित शिक्षकांना प्राधान्य द्या.
•    समाणीकरण रद्द करा.
•    शिक्षक पदोन्नती तात्काळ करा.
•    ऑनलाईन समुपदेशनाने बदली करा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rural development Minister Hasan Mushrif made statement about Transfer of primary teachers in the state