'साम' सर्वांत वेगवान नंबर 2 न्यूज चॅनेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - "सकाळ माध्यम समूहा'चा भाग असलेले "साम टीव्ही न्यूज चॅनेल' गेले काही महिने वेगाने लोकांच्या पसंतीला उतरत आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या 24 व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार दिग्गज न्यूज चॅनेलना मागे सारत साम टीव्ही न्यूजने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात 20.7 टक्‍के प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. यातून महाराष्ट्रातल्या 15 वर्षांवरील महिला आणि पुरुष प्रेक्षकांमध्ये साम टीव्ही न्यूज लोकप्रिय होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

"साम टीव्ही न्यूज चॅनेल' गेले काही महिने सातत्याने आणि वेगाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. "बार्क'च्या 24 व्या आठवड्याच्या प्रेक्षकांच्या रेटिंगनुसार झी 24 तास, नेटवर्क 18 लोकमतसारख्या प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे टाकण्याची किमया साधली आहे.

"साम'च्या निष्पक्ष बातमीपत्रातूनच ही किमया साधली गेली आहे. सर्व न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रांमध्ये साम टीव्ही न्यूजचे "टॉप 50 न्यूज' आणि "इथे नोकरी मिळेल' हे दोन्ही कार्यक्रम टॉप 100 कार्यक्रमांत सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. याशिवाय व्हायरल सत्य, स्पॉटलाइट, सरकारनामा 360, आज काय विशेष, मेगा प्राइम टाइम ही बातमीपत्रंही विशेष पसंत केली जात आहेत.

ग्रामीण भागात "टॉप'वर
ग्रामीण महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिले जाणारे न्यूज चॅनेल म्हणून साम टीव्हीने आपले स्थान बळकट केल्याचे "बार्क'च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण महाष्ट्रात साम टीव्ही न्यूज 22.3 टक्के पसंती मिळवून "टॉप'चे चॅनेल झाले आहे. झी 24 तास 21.7 टक्के घेत दुसऱ्या, तर एबीपी माझा 20.7 टक्के मिळवत क्रमांक तीनवर आहे.

सकारात्मकतेला प्राधान्य
समाजमाध्यमांमध्ये वाट्टेल त्या गोष्टी पसरवून सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या मानसिकतेला लगाम घालण्याच्या हेतूने "व्हायरल सत्य' हा कार्यक्रम साम टीव्हीने सुरू केला आणि आता या कार्यक्रमातून साम टीव्हीची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झालीय. युवक, महिला आणि कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी राखून वाहिनीने नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक समाजनिर्मितीला आपल्या कार्यक्रमांमधून प्राधान्य दिले आहे.

Web Title: saam TV channel number 2 sakal saam tv news channel