संभाजी भिडेंचा "मास्टर माइंड' शोधा - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर हे महान संत महाराष्ट्रातील जनतेची दैवते आहेत. मानवता ही या संतांची शिकवण आहे. मात्र, या महान संतांची मूल्ये व संस्कार याची तुलना मनू सोबत करणाऱ्या संभाजी भिडेंच्या जाहीर निषेधाचा ठराव करा. समाजात सतत फूट पाडताना शांतताप्रिय वारकरी दिंडीत तलवारी घेऊन जाणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा. त्यांचा मास्टर माइंड कोण ते शोधा,'' अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

संभाजी भिडेंनी तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांची तुलना मनूशी केल्यावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक झाले होते.

'वारकरी सांप्रदायासारख्या सर्वसमावेशक पंथाला आव्हान देण्याचे धाडस भिडे कोणाच्या जिवावर करतात? दिंडीत जाऊ नका अशी पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही कायदा मोडून ते जातात. यामागे कोणती शक्ती आहे? आंबे खाल्ल्याने मुले होतात अशी अंधश्रद्धा जाहीरपणे पसरवणाऱ्या संभाजी भिडेंना अटक का होत नाही?,'' असा सवाल पवार यांनी केला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संभाजी भिडेंचा निषेध करत त्यांच्यावर सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालणारा ठराव करा, अशी मागणी केली.

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करू - मुख्यमंत्री
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार मनुस्मृतीचे समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधान व कृत्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

Web Title: sabhaji bhide master mind ajit pawar politics