
सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनू शकतो का? वाचा काय सांगतो कायदा?
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या शंभर कोटी वसुली प्रकरणी (Anil Deshmukh Money Laundering case) कोठडीत आहेत. याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी आरोपी सचिन वाझे (Sachin Waze) याने ईडीला पत्र लिहिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण, खरंच सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवता येतं का? याबाबत ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा: अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, वाझेनी ईडीला लिहिलं पत्र
सीआरपीसी कलम 306, 307 नुसार माफीचा साक्षीदार करा अशी वाझेची मागणी कायद्यात बसत नाही. मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीला माफीचा साक्षीदार करणे चुकीचा पायंडा ठरेल, असं असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. तसेच शंभर कोटी भ्रष्टाचार प्रकरणातील सगळ्या 25 आरोपींना कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सचिन वाझेने पत्रात नेमकं काय म्हटलं? -
सचिन वाझेने शंभर कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यासाठी ईडीला पत्र लिहिले आहे. वाझे यासंदर्भात १४ फेब्रुवारीला न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरोधाच ईडीने दोषारोपपत्र दाखल केलं आहे. त्यानंतर देशमुखांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर देखील १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. वाझेने ईडीला लिहिलेल्या पत्रानुसार वाझे माफीचा साक्षीदार झाला तर देशमुखांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.
सचिन वाझेचे जबाब वारंवार बदलत आलेले आहे. आपल्याला देशमुखांनी वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं वाझेने यापूर्वी चांदीवाल आयोगासमोर सांगितलं होतं. त्यानंतर तोच जबाब बदलण्यासाठी त्यानं आयोगासमोर परत अर्ज सादर केला. देशमुखांनी वसुलीचे आदेश दिले होते आणि त्यामधून आलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले. देशमुख अत्यंत पॉवरफुल व्यक्ती असून माझ्यावर दबाव असलेल्या लोकांची नावे घेतली तर मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे, असं वाझेने चांदीवाल आयोगाला लिहिलेल्या अर्जात म्हटलं होतं. पण, आयोगाने अर्ज फेटाळून लावला.
Web Title: Sachin Waze Approver Request Not According To Law Anil Deshmukh Money Laundering Case Advocate Asim Sarode
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..