साहित्य महामंडळ हुकूमशाह होणार, श्रीपाल सबनीस यांची टीका

सुशांत सांगवे
सोमवार, 2 जुलै 2018

लातूर : "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक हाच पर्याय योग्य आहे. यातील दोष दूर करण्याऐवजी साहित्य महामंडळाने निवडणूक पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साहित्य महामंडळ आता 'हुकूमशाह' होईल," अशी टीका साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी येथे केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी घेतली जाणारी निवडणूक बंद करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने रविवारी घेतला. या निर्णयाचे कौतुक होत आहे आणि यावर टीकाही. डॉ. सबनीस सध्या लातूरमध्ये आले आहेत. त्यांच्याशी 'सकाळ'ने या विषयावर संवाद साधला. तेव्हा त्यांनी महामंडळाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.

सबनीस म्हणाले, "एक हजारवरून अधिक मतदार सध्या मतदान करतात. यातून संमेलनाध्यक्ष निवडला जातो. हे एक हजार मतदार महामंडळाने वाढवायला हवे; पण तसे झाले नाही. एक हजारऐवजी आता मूठभर लोक संमेलनाध्यक्ष कोण, हे ठरणार. म्हणजे हुकूमशाही प्रवृत्ती वाढणार. हे हुकूमशहा संमेलनाध्यक्ष नियुक्त करणार, याला सन्मानाने हे पद दिले जाणार असे कसे म्हणायचे? ही पद्धत अशीच सुरू राहिली तर पैसेवाले लोक यात शिरतील. लोकशाहीत निवडणूक पध्दतच असली पाहिजे."

Web Title: Sahitya Mahamandal will be dictators, Shripal Sabnis criticized