ग्रामसमृद्धीच्या शिदोरीसह सरपंच परतले गावाकडे

ग्रामसमृद्धीच्या शिदोरीसह सरपंच परतले गावाकडे

पुणे -  ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने आळंदीत भरलेल्या ग्रामकुंभातून मौल्यवान माहितीचा मेवा घेत सरपंच मंडळी गावाकडे परतली. ग्रामसमृद्धीची शिदोरी गोळा करताना दुष्काळाविरोधात लढण्याची नवी उमेद सरपंचांनी मिळविली. दोन दिवस चाललेल्या या महापरिषदेचा समारोप रविवारी (ता.२५) सायंकाळी उत्साही वातावरणात झाला.

संबंधित बातम्या

सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स लि., पॉवर्ड बाय जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. होते. प्रायोजक सोनाई पशू आहार, मारुती सुझुकी इंडिया लि., बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., विक्रम टी, डॉलिन - सिडलर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा बायोसिस्टिम्स प्रा. लि., राज्य जलसंधारण विभाग, रोजगार हमी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान होते. राज्यभरातील निवडक उच्च शिक्षित, युवा सरपंच, तसेच महिला सरपंचांनी या ग्रामकुंभात उत्साहाने भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच पोपटराव पवार, चंदू पाटील, जयंत पाटील कुर्डूकर यांच्या अभ्यासपूर्ण भाषणातून भरपूर माहिती मिळाली, अशी भावना अनेक सरपंचांनी व्यक्त केली. 

राज्यातील कृषी व ग्रामविकासाची निरंतर चळवळ असा लौकिक मिळालेल्या या उपक्रमातून प्रशिक्षण घेतलेल्या सरपंचांची संख्या आता आठ हजारांवर पोचल्याचे ‘अग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी समारोप सोहळ्यात सांगितले. “शहरी भागाला सतत संधी मिळते. मात्र, गावे डावलली जातात. शेती भकास होतेय. त्यामुळे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. हा वसा यापुढेही सुरू ठेवू,” असे उद्गार श्री. चव्हाण यांनी काढले. त्यामुळे भारावलेल्या सरपंचांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पाठिंबा दर्शविला.  

‘सरपंच फक्त सहीचे मानकरी’
सरपंचांना मान मिळतो; पण मानधनाची चर्चाच होते. सरपंच फक्त सहीचे मानकरी आहेत. ग्रामसेवकाकडे सगळे अधिकार एकवटले आहेत. परंतु या अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे. त्याशिवाय ग्रामविकासाला गती मिळणार नाही, विकासात ग्रामस्थांचा सहभाग अधिक वाढणार नाही, असे मुद्दे ॲग्रोवन सरपंच महापरिषदेला उपस्थित विविध भागांतील सरपंचांनी मांडले.

सरकारने सरपंच होण्याची परीक्षा कडक केली आहे. आता पुढे ही परीक्षा अधिक कठीण होईल. कारण ज्याला गावातून व्यापक समर्थन असेल, तोच निवडू शकेल. सरपंचापुढे अडचणी आहेतच, त्यात तो फक्त सहीचा मानकरी आहे. कारण ग्रामसेवक त्यांचे ऐकत नाहीत. ग्रामसेवक मनाला हवी ती कामे करून घेतात. जिल्हा परिषदेत पूर्वी अध्यक्षांना बदली, खर्च करण्यासह काही धोरणात्मक अधिकार होते. त्या अधिकारांवर गदा आणली, आता अध्यक्ष साध्या कारकुनाची बदली करू शकत नाही, अशीच अवस्था सरपंचाची आहे. सरपंचाला मान मिळू लागला आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला मिळतो. हा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात येतो, पण तो खर्च करण्यासंबंधी निकष, अटी आहेत. दलितवस्ती सुधार, महिला विकास, आरोग्य, दिव्यांग विकास असे अनेक मुद्दे आहेत अशा भावना यावेळी विविध भागांतून आलेल्या सरपंचांनी व्यक्त केल्या.

सरपंच हा सहीचा मानकरी आहे. किमान ग्रामसेवकाएवढे अधिकार सरपंचांना द्यावेत. यामुळे विकासाला गती मिळेल. हवी ती विकासकामे गावात करता येतील. 
- बाळासाहेब घुले, सरपंच, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे.

सकाळ ॲग्रोवनचा जयघोष
समारोप होताच सरपंचांनी अॅग्रोवनच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव केला. यात युवा, तसेच महिला सरपंच आघाडीवर होते. विशेष म्हणजे सकाळ-अॅग्रोवनचा विजय असो, अशा घोषणा देत सरपंचांनी आपल्या दोन दिवस मिळालेल्या ग्रामविकासाच्या शिदोरीविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com