मृतांच्या वारसांना  दहा लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

धुळे - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि समाजमन सुन्न करणाऱ्या राइनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील पाच जणांच्या अमानुष हत्याकांडानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. त्यानंतर आपल्या विनंतीवरून ही मदत प्रत्येकी पाचवरून दहा लाख केल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

धुळे - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि समाजमन सुन्न करणाऱ्या राइनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील पाच जणांच्या अमानुष हत्याकांडानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. त्यानंतर आपल्या विनंतीवरून ही मदत प्रत्येकी पाचवरून दहा लाख केल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाइकांच्या चार मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर त्यांनी आक्रोश करीत मृतदेह दुपारी चारच्या सुमारास ताब्यात घेतले व ते दुपारी चारनंतर खवेकडे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) रवाना झाले. दरम्यान, हत्याकांडप्रकरणी अटकेतील चौदा गावांतील २३ संशयितांना आज साक्री न्यायालयाने सहा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.   

राइनपाड्यात रविवारी (ता. १) घडलेल्या घटनेच्या दुपारी साडेबारापासून आज (सोमवार) दुपारी पावणेचारपर्यंत पाचही मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात होते. पीडित प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपये व घर, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सुरक्षितता मिळावी, या मागण्या मान्य झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा पीडित कुटुंबीयांसह नातेवाईक, समाजाध्यक्ष, मंगळवेढ्याचे सरपंच मारुती भोसले यांनी घेतला होता. 

पीडितांची काढली समजूत
पिंपळनेर-साक्री रोडवर डेरा टाकलेल्या पीडित कुटुंबीयांच्या झोपडीवजा घराकडे आज दुपारी एकपर्यंत कुठलाही शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी न फिरकल्याने पीडितांनी संताप व्यक्त केला. नंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, पिंपळनेरचे पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड आदींनी पीडितांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतानाच मृतदेह स्वीकारण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पीडित कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

राइनपाड्यात क्रौर्य, रक्तपात
आदिवासीबहुल काकरपाडा, राइनपाड्यात रविवारी (ता. १) सकाळी अकरानंतर मुलांना पळविणे, किडन्या चोरी करणारी टोळी दाखल झाल्याची अफवा पसरली. राइनपाड्यात आठवडे बाजार असल्याने पंचक्रोशीतील गाव-पाड्यांमधील तीन ते चार हजारांवर ग्रामस्थ दाखल झाले होते. असे असताना एसटीने आलेले, साध्या वेशातील नाथपंथी डवरी समाजातील आणि गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्या भारत शंकर भोसले (वय ४५), भारत शंकर माळवे (४५), दादाराव शंकर भोसले (३६, रा. खवे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), राजू भोसले (४७, रा. गोंदवून, कर्नाटक), अग्नू इंगोले (२०, रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांच्यावर काही तरुणांचा मुले पळवून नेण्याविषयी संशय बळावला. त्यातून हिंसक जमावाने अमानुष, क्रौर्याची परिसीमा गाठत या पाचही जणांची ठेचून हत्या केली होती. पाच जणांच्या हत्याकांडानंतर राइनपाडा गावातील वृद्ध महिला, पुरुष वगळता सर्वच ग्रामस्थ जंगलाकडे पसार झाले. राइनपाड्यात चोख बंदोबस्त असून, गाव रिकामे असल्याने स्मशानशांतता पसरली आहे. 

मदतीसह लेखी आश्‍वासन
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी वारसांना आर्थिक मदत जाहीर केल्यावर आणि घटनेतील दोषींवर कठोर कारवाई, ‘एसआयटी’कडे तपास, खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मृत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान, वारसांना सरकारी नोकरी, भिक्षुकी व्यवसाय करणाऱ्यांना स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षिततेची हमी, संरक्षणासाठी कायदा संमत होण्यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे लेखी आश्‍वासन जिल्हाधिकारी रेखावार यांनी मागणीकर्त्यांना दिले. नंतर पिंपळनेर ग्रामस्थ, पोलिसांच्या आर्थिक मदतीनंतर मृतदेहांसह नातेवाईक वाहनांनी दुपारी चारनंतर मंगळवेढ्याकडे रवाना झाले.

Web Title: sakri murder case Ten lakhs of help to the heirs of the deceased