
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्ह्यात २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात विदेशी दारूची विक्री ८ लाख १३ हजार १८४ लिटर दारूची विक्री झाली होती. २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात मात्र ५ लाख ७४ हजार १ लिटर विदेशी दारूची विक्री झाली. म्हणजेच २ लाख ३९ हजार १८३ लिटर कमी दारूची विक्री झाली. हे विक्री घटण्याचे प्रमाण तब्बल २९.४१ टक्के आहे. देशी दारू, वाईन आणि बिअरचीही विक्री घटली असून दुसरीकडे महसूल उद्दिष्ट ५९० कोटींचे असल्याने हे गणित कसे साधायचे, याची चिंता अधिकाऱ्यांना लागली आहे.
राज्य शासनाने देशी-विदेशी दारूचे दर वाढविले आहेत. १८० मिलिलिटर (एमएल) देशी दारूची बाटली ८० तर भारतीय बनावटीची विदेशी दारू अडीचशेवरून ३६० रुपयांना झाली आहे. याशिवाय हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये विदेशी दारू विक्रीवर १५ ते २० टक्क्यांचा अतिरिक्त शुल्क आकारला आहे. त्यामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात जुलैमध्ये १३ हजार ७३४ लिटर तर जुलै-ऑगस्टमध्ये तीन लाख ६६ हजार लिटरने विदेशी दारूची विक्री कमी झाल्याची बाब समोर आली आहे. दरवर्षी सोलापूर शहर-जिल्ह्यात सुमारे ३५० ते ४५० कोटींची दारू विक्री होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होते, अशीच स्थिती दरवर्षी पाहायला मिळाली.
पण, राज्य सरकारने देशी व विदेशी दारूचे दर वाढविले आणि विक्रीवरील अतिरिक्त शुल्कातही वाढ केली. त्यामुळे १८० मिलिलिटर देशी-विदेशी दारूच्या बाटलीचे दर ८० ते १६० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे मद्यपींनी पिण्याचे प्रमाण कमी केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी वाढवून दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, याची चिंता अधिकाऱ्यांना सतावू लागली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयांना असेच महसुलाचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.
देशी-विदेशी दारूची विक्री (‘एमएल’मध्ये)
१) देशी दारू विक्री
(२०२४-२५) : ३८,४९,३७८ लिटर
(२०२५-२६) : ३९,६१,९८१ लिटर
विक्रीतील फरक : १,१२,६०३ लिटर
जुलै महिन्यात १३,७३४ लिटरने देशी दारूची विक्री कमी झाली
-------------------------------------------------------------------------------
२) विदेशी दारू विक्री
(२०२४-२५) : ४२,४१,३७४ लिटर
(२०२५-२६) : ४२,६५,५३६ लिटर
विक्रीतील फरक : २४,१६२ लिटर
जुलै महिन्यात ६७ हजार ६९८ लिटर तर ऑगस्टमध्ये दोन लाख ३९ हजार १८३ लिटरने विदेशी दारूची विक्री कमी झाली
--------------------------------------------------------------------------------
३) बिअर विक्री
(२०२४-२५) : ३४,४८,०९८ लिटर
(२०२५-२६) : ३६,९४,६०१ लिटर
विक्रीतील फरक : २,४६,५०३ लिटर
जून महिन्यात ११ हजार १८२ लिटरने बिअरची विक्री कमी झाली
--------------------------------------------------------------------------------------
४) वाईन विक्री
(२०२४-२५) : ५०,४३३ लिटर
(२०२५-२६) : ६३,९५० लिटर
विक्रीतील फरक : १३,५१७ लिटर
मे महिन्यात ९३४ लिटरने वाईनची विक्री कमी झाली
दारूचा खप कमी, तरी महसुलाचे उद्दिष्ट दुप्पट
शासकीय योजनांवरील खर्चाची भागवाभागव करताना शासनाने आरटीओ (परिवहन विभाग), खरेदी-विक्री कार्यालये (मुद्रांक शुल्क विभाग) व राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसुलाचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला गतवर्षी २६० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट होते, त्या वर्षी दारूचे दर स्थिर असल्याने विभागाने तब्बल ३८५ कोटींचा महसूल शासनाला दिला. यंदा मात्र दारूचे दर वाढल्याने खप कमी झालेला असताना देखील ५९० कोटींच्या महसुलाचे टार्गेट दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.