
मुश्रीफांना समरजितसिंह यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
कागल (कोल्हापूर): रामनवमीला जन्माला आल्याचा हसन मुश्रीफांचा (Hasan Mushrif) दावा खोटा आहे. पुरावे देऊन देखील पोलिस तक्रार दाखल करत नाहीत. मात्र तक्रार दाखल होईपर्यंत मी येथून हलणार नाही असा इशारा भाजपाचे समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी दिला. यावेळी हसन मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमीला झाला असल्याचा गौप्यस्फोट पुरावे दाखवत त्यांनी केला. मुश्रीफांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सडेतोड उत्तर दिले. (Samarjeetsinh Ghatge Reply to Hasan Mushrif)
हेही वाचा: मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन वाद, राजकारण तापणार?
यावेळी त्यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात साखर कारखाने,विकिपीडिया वरचे पुरावे सादर केले. ते म्हणाले, विकिपीडिया वरती २४ मार्च १९५४ ही तारीख आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला दिलेल्या कागदपत्रांमध्ये देखील हीच जन्मतारीख आहे. ते ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी रंगपंचमी होती राम नवमी नव्हती. मुश्रीफांनी स्वतःच्या अंगावर खोटे रंग रंगवून घेतले आहेत. ११ एप्रिल १९५४ ला रामनवमी असते. तब्बल १८ दिवसानंतर राम नवमी येते असं सांगत त्यांनी पंचाग दाखवले. अखंड बहुजन समाजाचा त्यांनी अपमान केला असल्याची भावना व्यक्त केली.
हेही वाचा: समरजितसिंहांना हे धाडस महागात पडेल; मुश्रीफांचा थेट इशारा
पुढे ते म्हणाले, बहुजन समाजामामध्ये सहनशीलता आहे. प्रभू रामचंद्रांची केलेली थट्टा खपवून घेणार नाही असा इशाराही समरजीतसिंह घाटगे यांनी दिला. ज्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्यात मुश्रीफांना संस्थापक केले त्यांचा अपमान ते करत आहेत. लोकवर्गणीतून तयार झालेले राममंदिर स्वतः बांधल्याचे ते सांगताहेत. तुम्ही मालक झाला आहात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राम मंदिरसाठी वाडा पाडून जागा दिली हे बोलून दाखवायची आज त्यांनी वेळ आणली. तुम्ही धर्मासाठी एक गुंठा जागा देऊन दाखवा असे आव्हान त्यांनी दिले. तुमच्या खोटं बोलण्याचे उत्तर महाराष्ट्र तुम्हाला देईल असेही ते म्हणाले.
सदाशिव मंडलिकांनी स्वतःच्या रक्ताच्या वारसाला बाजूला ठेऊन मुश्रीफांना आमदार, मंत्री केलं. त्यांच्याच पाठीत खंजिर खुपसला. त्यांना म्हातारा बैल, वाळलेले पान असे अपशब्द वापरून अपमान केला. विक्रमसिंह घाटगे यांचा अपमान केला अशा व्यक्तीला उत्तर देणं मी माझा अपमान समजतो असेही ते म्हणाले. मुश्रीफांच्या कोणत्याही धमकीला मी घाबरत नाही. जनतेसाठी आणि प्रभू रामचंद्रांसाठी मला जी किंमत मोजावी लागणार आहे ती मी मोजणार असल्याचेही ते म्हणाले. जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
Web Title: Samarjeetsinh Ghatge Reaction On Hasan Mushrif Allegation Kagal Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..