संभाजी ब्रिगेडसमोर पक्ष म्हणून व्हीजन हवे

प्रकाश पाटील 
शनिवार, 10 डिसेंबर 2016

संभाजी ब्रिगेडने आता सक्रिय राजकारणाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची स्थापना करीत असाल तर तुमच्याकडे व्हीजन हवे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने संघटित होऊ पाहणाऱया मराठा तरूणाईला दिशा देणारे व्हीजन असेल, तर पक्ष म्हणून सक्रिय राजकारणात यशस्वी होण्याच्या संधी आहेत. 

संभाजी ब्रिगेडने आता सक्रिय राजकारणाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची स्थापना करीत असाल तर तुमच्याकडे व्हीजन हवे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने संघटित होऊ पाहणाऱया मराठा तरूणाईला दिशा देणारे व्हीजन असेल, तर पक्ष म्हणून सक्रिय राजकारणात यशस्वी होण्याच्या संधी आहेत. 

नगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे महिनाभर असेल. राज्यात मराठा समाजाने मूक मोर्चे काढून जे शक्तीप्रदर्शन केले त्याची धडकी सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांनी घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात निवडणुकीचे रणांगण गाजले. या रणांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उतरले. विजयश्री खेचून आणला. ज्यावेळी हे मोर्चे निघत होते त्यावेळी सत्ताधाराऱ्यांचे काही खरे नाही असे बोलले जात होते. पण "एक मराठा, लाख मराठा'चा या निवडणुकीवर लक्षणीय फरक पडला नाही हे स्पष्ट निकालानंतर स्पष्ट झाले. मूक मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने एकजूट झालेले मराठे निवडणूक येताच पांगले. राजकारण, सत्ता, खुर्चीसाठी ते पक्षांच्या दावणीला बांधले. मराठा समाजाचे दुर्दैव असे की तो कधीच एखाद्या गोष्टीवर ठाम राहात नाही. आताच्याच निवडणुकीतील चित्र पाहा प्रत्येक राजकीय घराण्यात (मराठा) नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदासाठी फूट पडली. घरांत संघर्ष पेटला. या फुटीचा फायदा कोणी आणि कसा घेतला हे मराठा समाजाला कळले नाही. मराठ्यांना शह देण्यासाठी दलित समाजाने काढलेल्या मोर्चाबाबतही तेच झाले. ते ही कोणाच्या बाजूचे हे कळले नाही. निवडणुकीत मराठा समाजाच्या मोर्चाचा "राष्ट्रवादी'ला खूप फायदा होईल असे बोलले जात होते. पण, मराठवाडा वगळता अन्यत्र तसे घडले नाही. मराठा मोर्चावर सामनात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्राने शिवसेनेवर टीका झाली. समाजात नाराजी होती.पण त्याचाही शिवसेनेला फटका बसलेला दिसत नाही. 

देशात आजपर्यंत जातीपातीचेच राजकारण चालत आले. भाजप म्हटले की भटा-बामनांचा, कॉंग्रेस म्हटले की मराठ्यांचा, दलित म्हटले की रिपब्लिकनांचा अशी सर्वच पक्षांची कमीअधिक प्रतिमा बनली होती. पण, ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केल्याने त्यांना निवडणुकीत यश मिळाल्याचे दिसते. अगदी बसपचा जरी विचार केला तरी त्यांनाही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करावा लागला. तेव्हा कुठे सत्तेवर येता आले. 

हे सर्व सांगण्याचे कारण असे की स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या ताकदीचे चित्र दिसले नाही. याचा बहुधा विचार करून संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या फडात उतरण्याचा निर्णय घेतला असावा. यापूर्वी पुरुषोत्तम खेडेकर यांनीही तसा प्रयोग करण्याची तयारी दाखविली होती. परंतु हा प्रयोगही यशस्वी झाला नव्हता. वास्तविक आज देशात शेकडो पक्ष आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 2011 मध्ये तब्बल 1,300 पक्ष देशात अस्तित्वात होते. त्यामध्ये आणखी एका पक्षाची भर पडेल या पलीकडे हाती काही लागेल असे वाटत नाही. एकाच समाजाची मागणी घेऊन कोणताही पक्ष कदापी यशस्वी होऊ शकत नाही. हे प्रत्येक समाज किंवा जातीच्या पक्षावरून स्पष्ट होते. 

संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरण्यामागे महत्त्वाचे कारण असे असू शकते की मराठा समाजातील प्रस्थापित नेते दुसऱ्याचा विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांना कधीच संधी मिळत नाही. ज्यांना संधी नाही ते भाजप किंवा शिवसेनेत जातात. त्यांना उमेदवारी मिळते. ते प्रस्थापितांविरोधात लढतात. आवाज उठवितात. निवडून येतात. कदाचित हेच गणित ब्रिगेड समोर असेल. मात्र केवळ मराठा समाजाला घेऊन निवडणूक जिंकणे शक्‍य नाही. सर्वच जातीपातींना बरोबर घेऊन त्यांची मोट बांधल्यास परिवर्तन दिसून येईल. 

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की प्रवीण गायकवाड यांच्या सारखा ब्रिगेडला चेहरा होता. तसा चेहरा आता नाही. शिवाय समाजात सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात उतरून अनेक प्रश्‍नावर आंदोलने करता येतात. सामान्यांसाठी रस्त्यावर उतरता येते.पण ब्रिगेड काही करताना दिसत नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मरगळ आहे. सरकारविरोधात बुलंद आवाज करणार कोणी नेताही नाही. कॉग्रेसऐवजी शिवसेनाच विरोधीपक्षाची भूमिका पार पाडत. लोकांच्या प्रश्‍नावर भिडण्याऐवजी मध्यंतरी ब्रिगेडने कल्याणमध्ये ये दिल है या चित्रपटाविरोधात आंदोलन केले. अशाप्रकारची आंदोलने करून ते काय साध्य करू इच्छितात हे कळत नाही. पक्ष म्हणून पुढे यायचे असेल तर व्हीजन असायला हवे. पक्ष स्थापन करता आहात तर का आणि कशासाठी पक्ष? हे लोकांना पटवून देण्यासाठी साधी पुस्तिकाही नाही. लोकांचा तुम्ही विश्वास कसा संपादन करणार हे प्रथम सांगितले पाहिजे. अन्यथा आणखी एका पक्षाची नोंद झाली यापलीकडे काय? असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. मोर्चाच्या निमित्ताने संघटित होऊ पाहणाऱया मराठा समाजातील तरूणांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रम आखला, तरच या पक्षाचा लक्षणीय ठसा उमटू शकतो. 

Web Title: sambhaji brigade should have vision as party