संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेने शिवसेना अस्वस्थ

शाम देऊलकर
बुधवार, 11 जानेवारी 2017

संभाजी ब्रिगेडसारख्या निवडणुकीच्या तोंडावर उगवणाऱ्या पक्षाला आम्ही फार महत्त्व देत नाही. हे ब्रिगेडवाले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून त्यांची सर्वाधिक बदनामी करत आहे. शिवसैनिक असल्या ब्रिगेडींमुळे अजिबात विचलित होऊ शकत नाहीत.
-अरविंद भोसले, प्रवक्ता, शिवसेना

दादर (मुंबई) येथील शिवसेना भवनावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हटविण्याच्या धमकीमुळे मुंबईतील शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेड व शिवसेनेमध्ये संघर्ष होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. कधीच कुणाची धमकी ऐकण्याची सवय नसलेली शिवसेना येणाऱ्या काळात ब्रिगेडला कशी हाताळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीमुळे मुंबईत कधी न पडणारी थंडी पडूनही राजकीय वातावरण मात्र दिवसेंदिवस तप्त होत चालले आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची निवडणूकपूर्व युती होणार की नाही याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असताना "मराठा' अस्मितेचे राजकारण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून समाजाचे प्रश्‍न मांडत आता निवडणुकीच्या राजकारणात उडी घेऊन थेट आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेशीच पंगा घेतला आहे. ब्रिगेडच्या या धमकीला सेना कशी उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेतृत्व व नेत्यांनी जरी संभाजी ब्रिगेडला धोरणीपणाने उत्तर देण्याचे ठरवले तरी ब्रिगेडच्या बाळासाहेबांचा फोटो हटविण्याच्या इशाऱ्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. अशी धमकी व इशारे ऐकण्याची शिवसैनिकांना सवय नसल्याने शिवसैनिक मात्र अस्वस्थ झाले आहेत. राजकारणात पदार्पण करणारा एवढासा पक्ष शिवसेनेला धमकी कशी काय देऊ शकतो, या सवालामुळे शिवसेनेच्या शाखांमधील वातावरण ऐन थंडीत गरम झाले आहे. "मराठी' व "मराठा' अस्मितेचे राजकारण करणाऱ्या बलाढ्य व नव्या पक्षातील हा वाद भविष्यात कोणते वळण घेतो याकडे राजकीय पंडितांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ब्रिगेडकडे दुर्लक्ष करणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आक्रमकपणापेक्षा संयत राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मांडणीनुसार ते संभाजी ब्रिगेडला जास्त महत्त्व न देण्याचीच शक्‍यता आहे. तसेच एका जातीचे राजकारण करणारा हा नवा पोलिटिकल ट्रेंड वाढू न देण्याची भूमिका सर्वच राजकीय पक्ष कमी-अधिक प्रमाणात घेण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Sambhaji Brigade's political role and Shiv Sena