समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांचे एकमत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापुढे हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात दिली.

मुंबई - मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापुढे हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आणखी काही निर्णय घेण्यात आले. या वेळी समृद्धी महामार्गाचे नामकरण्याचा प्रस्ताव शिंदे यांनी मांडला. या प्रस्तावाला अन्य मंत्र्यांनी एकमताने पाठिंबा दिला.

आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  

समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी अलीकडेच केली होती, त्यामुळे हा नामकरण वाद चिघळण्याची चिन्हे असताना सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या महामार्गाला माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित केला होता; मात्र शिवसेनेने बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह धरला होता. त्याबाबतचे पत्र तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्या वेळी भाजप व शिवसेनेची युती असल्यामुळे फडणवीस यांच्यापुढे पेच निर्माण होऊन हे नामकरण बारगळले होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samruddhi highway balasaheb thackeray name state mantrimandal meeting