शिक्षकांसाठी संमेलनाध्यक्षांची ‘संवाद यात्रा’

सुशांत सांगवे  
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर हारतुरे स्वीकारण्यात अन्‌ भाषणे करण्यातच वर्ष संपते. त्यामुळे संमेलनाध्यक्षांना ठोस काही करता येत नाही. ही चौकट मोडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी राज्यातील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांशी कार्यशाळांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर - संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर हारतुरे स्वीकारण्यात अन्‌ भाषणे करण्यातच वर्ष संपते. त्यामुळे संमेलनाध्यक्षांना ठोस काही करता येत नाही. ही चौकट मोडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी राज्यातील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांशी कार्यशाळांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा हा संवादाचा केंद्रबिंदू असेल. संमेलनाध्यक्षांकडून अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच होत असून, त्याची सुरवात लातूरमधून होणार आहे.

येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी डॉ. ढेरे बुधवारी (ता. २८) लातूरमध्ये येत आहेत. यानिमित्त संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, मराठीतून अध्यापन फार विचारपूर्वक केले जाते, असे नाही. कारण, आपण शिक्षणव्यवस्थेची एक चौकट बांधली आहे. त्यापलीकडे जात नाही. शिक्षकांनी तसा प्रयत्न करणे, मुलांना भाषेची गोडी लावणे, त्यांच्यात साहित्याची जाण वाढवणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा भागांत शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार आहोत.याबरोबरच ‘कविता ः आकलन आणि रसास्वाद’ या विषयावर आठवीपासून पुढील इयत्तांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाईल.

दुष्काळाचे भान ठेवावे
आगामी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. पण, उस्मानाबादमध्ये अजूनही भीषण दुष्काळ आहे. वर्षानुवर्षे या भागात अशीच स्थिती आहे. येथील लोक खूप काळापासून दुष्काळ भोगत आहेत. त्यामुळे या भागात सांस्कृतिक-साहित्यिक भूकही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून, येथे साहित्य संमेलन होणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण, दुष्काळी भागात संमेलन होत आहे, याचे भान ठेवून अत्यंत साधेपणाने, लेखक-कवींनी कमीत कमी अपेक्षा ठेवून हे संमेलन साजरे करावे, असे डॉ. ढेरे म्हणाल्या.

...यांचाही व्हावा संमेलनाध्यक्षपदासाठी विचार
आगामी संमेलनाध्यक्षपदासाठी ना. धों. महानोर, नरेंद्र चपळगावकर, रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ यांची नावे चर्चेत आहेत. यातील काहींनी या पदासाठी नकारही दर्शविला आहे; याबाबत डॉ. ढेरे म्हणाल्या की, ही सर्वच नावे संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य आहेत. या नावांनंतर किंवा या नावांसोबतच आशा बगे, प्रभा गणोरकर यांच्यासह मधल्या फळीतील सक्षम लेखकांचाही विचार व्हायला हवा. पण, केवळ ज्येष्ठांचीच नावे पुढे येत राहतात.ट

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी मुख्यमंत्री महिनाभरात वटहुकूम काढणार होते. पण, तो अद्याप काढला गेला नाही. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरात लवकर घ्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत आहे.
- डॉ. अरुणा ढेरे, संमेलनाध्यक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samvad yatra for teacher