राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील की मुंडे?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

सांगली - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची वर्णी लागणार की विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना संधी मिळणार? याचा निर्णय आज (ता. २९) पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत होणार आहे.

सांगली - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची वर्णी लागणार की विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना संधी मिळणार? याचा निर्णय आज (ता. २९) पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत होणार आहे. प्रदेशाध्यक्षाची घोषणा पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार करणार आहेत. जयंत पाटील यांची निवड झाल्यास राष्ट्रवादीची सूत्रे पुन्हा एकदा सांगलीकडे येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुण्याला रवाना झाले आहेत.

काही दिवसांपासून या पदासाठी आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे. यांतील काही नावे मागे पडून जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर आहे; तर त्यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांचे नाव आहे. 

माजी मंत्री ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ कामकाजाचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांचे पारडे जड आहे. 

सुपुत्र की जावई? 
सांगलीकरांसाठी जयंत पाटील किंवा धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष झाले; तरी दोघांचाही सांगलीशी ऋणानुबंध आहे. जयंत पाटील हे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत; तर धनंजय मुंडे हे जावई आहेत. त्यांची सासुरवाडी मिरज तालुक्‍यातील बेडग आहे; त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी जिल्ह्याचा सुपुत्र बसणार की जावई, ही उत्सुकता आहे.

वादावर आज चर्चा?
सांगलीत शहर राष्ट्रवादीमध्ये असलेल्या नगरसेवक संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील गटाच्या वादावर पुण्यात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलनानंतर या वादावर बैठक घेण्याचे सांगितले होते. त्यामुळे ही बैठक उद्या होईल या आशेने दोन्ही गट पुण्याला रवाना झाले आहेत.

Web Title: Sangli News NCP State president selection