Sanjay Raut : राऊत – ठाकरेंची मातोश्रीवर गळाभेट अन् शेकडो शिवसैनिकांचे डोळे पाणावले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Aditya Thackeray
Sanjay Raut : राऊत – ठाकरेंची मातोश्रीवर गळाभेट अन् शेकडो शिवसैनिकांचे डोळे पाणावले!

Sanjay Raut : राऊत – ठाकरेंची मातोश्रीवर गळाभेट अन् शेकडो शिवसैनिकांचे डोळे पाणावले!

शिवसेना खासदार संजय राऊत यांची अखेर १०३ दिवसांनंतर काल तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. त्यानंतर अनेक शिवसैनिक, तसंच राऊतांच्या परिवारातले सदस्य भावूक झालेले पाहायला मिळाले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांचं जल्लोषात स्वागतही झालं. मात्र, या सगळ्याहून अधिक चर्चा आहे मातोश्रीवर दिसलेल्या भावनिक बंधाची!

हेही वाचा: Sanjay Raut : शरद पवारांना घाबरवण्यासाठी आरोपपत्रात त्यांचं नाव; न्यायालयाचं निरीक्षण

संजय राऊत यांची काल तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. यानंतर ते वाजत गाजत आपल्या भांडूपमधल्या घरी गेले. त्यानंतर आज सकाळी ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी पहिल्यांदाच ठाकरे परिवारातला एक सदस्य संजय राऊतांची वाट पाहत मातोश्रीच्या गेटवर उभा होता. हा ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे. अन् संजय राऊत आदित्य ठाकरेंसमोर येताच दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. संजय राऊतांनी आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावरुन प्रेमाने हातही फिरवला.

हेही वाचा: Sanjay Raut : "सावरकर, लोकमान्य टिळकांप्रमाणे मीही जेलमध्ये एकांतात होतो"

हे पाहून तिथे जमलेले शिवसैनिक भावूक झालेले पाहायला मिळाले. अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रूही तरळले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत तो आपला जवळचा मित्र आहे आणि घरातलाच एक सदस्य आहे असं म्हटलं. तर संजय राऊतांनीही ठाकरे आपल्या परिवाराची काळजी घेत असल्याने आपण जेलमध्ये निर्धास्त होतो, असं सांगितलं. शिवाय तेजस ठाकरेंनी आपल्याला फोन करून आपल्याशी १५ मिनिटं गप्पा मारल्याचंही सांगितलं. या काही प्रसंगांमधून ठाकरे आणि राऊत परिवारातला घरोबा दिसून आला.