
आज सायंकाळी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरलीये. राऊतांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission) खालच्या शब्दांत टीका केलीये.
Sanjay Raut : शिवसेना तुमच्या बापाची आहे का? अर्वाच्य शब्दांत राऊतांची निवडणूक आयोगावर टीका
सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप-शिवसेनेनं केली होती. यासाठी समितीही गठीत करण्यात आली, त्यामुळं राजकारण चांगलंच तापलंय.
त्यात आता संजय राऊतांनी 'चोरमंडळ' विधानावर स्पष्टीकरण दिलं. 'चोरमंडळ' विधानावरून राजकारण तापलं असताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुद्धा विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटलं ना, त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. मीही तेच म्हणालो, विधीमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल, असं काही विधान मी केलं नाही, असं स्पष्टीकरण राऊतांनी सकाळी कोल्हापुरात दिलं.
मात्र, आज दुपारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरलीये. राऊतांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission) खालच्या शब्दांत टीका केलीये. 'संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहून घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं. शिवसैनिक इथंच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं, ते 50 खोके देवून पळून गेलेत.'
राऊत पुढं म्हणाले, निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची (एकनाथ शिंदे गट) आहे, तुमच्या बापाची आहे का? ही शिवसेना निवडणूक आयोगानं निर्माण केली का?, असा संतप्त सवाल राऊतांनी सांगलीतील कार्यक्रमात उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली.
भाजपनं पाठीत खंजीर खूपसलं
वसंतदादा पाटील, नाना पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचं आक्रमण झालं, त्यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठिशी होते. भाजपनं पाठीत खंजीर खूपसले. हे भांडण आता 40 चोरांशी नाही, तर भाजपशीही आहे, असा इशाराही राऊतांनी दिला.
हक्कभंगाच्या नोटिसीवर काय म्हणाले?
नोटीस आली असेल, पण मी अजून पाहिली नाही. माझ्या हातात नोटीस पडली नाही. नोटीस जेव्हा मी घरी, कार्यालयात जाईन तेव्हा पाहीन. तसंच माझ्या हातात जर नोटीस आली असती तर ती मी उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईनं कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही. तसंच मी माझी बाजू समर्थपणे मांडेन, असं देखील राऊतांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.