
'मला भीती वाटते की...', ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचं वक्तव्य
नागपूर : सध्या महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली. त्यावरूनच संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजप आणि तपास यंत्रणांना टोला लगावला आहे. मला भीती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल, असं संजय राऊत म्हणाले. शिवसंपर्क अभियानासाठी ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा: लढत राहायचं! तपास यंत्रणांच्या कारवाईवरून मुख्यमंत्र्यांचा निर्धार
केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं सुडाच्या भावनेनं, बदल्यांच्या भावनेनं कारवाई करत आहेत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचं गृहमंत्रालय कधीच कारवाई करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहे, तरी ते सत्य नाही. आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. पण, आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
निल सोमय्यांबाबत सरकारकडे काही पुरावे देण्याचं काम केलं. त्यापुढचं काम तपास यंत्रणांना करायचं आहे. पुराव्यात काही दम असेल तर पोलिस कारवाई करतील. त्यांच्यावर माझा आणि सरकारचा दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत. आम्ही त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया सुरू आहेत. ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तिथं राज्यपाल आणि केंद्रीय तपास यंत्रणा टार्गेट करतात, असा आरोप संजय राऊतांनी केला.
महागाईवरून भाजपवर टीका -
तेलाच्या किंमती वाढत आहेत. संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या धोरणानुसार महागाई वाढत चाचली आहे. लोक यामध्ये फसतात. देशात पुन्हा एकदा महागाई सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे. खरी समस्या रशिया-युक्रेन युद्ध, हिजाब, काश्मीर फाईल्स नाहीतर बेरोजगारी आणि महागाई आहे. पण, सरकार दुर्लक्ष करतेय, असाही आरोपही राऊतांनी भाजपवर केला.
Web Title: Sanjay Raut Criticized Ed And Bjp Over Action Against Maharashtra Ministers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..