
राऊतांवरच्या कारवाईवर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया; "या यंत्रणांना..."
शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी ७ वाजल्यापासून चौकशी सुरू आहे. विविध नेत्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी संजय राऊतांची बाजू घेत कारवाईचा निषेध केलाय, तर काही जणांनी या कारवाईला समर्थन दिलंय. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवारांनी या प्रकरणावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना तपासाचा अधिकार आहे, त्यानुसार तपास करतायत, अशी मोघम प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, या यंत्रणांना तपासाचा अधिकार आहे, त्यानुसार ते तपास करतायत. सगळ्या विविध विभागांमध्ये तक्रारी आल्या तर चौकशीचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत आहे. आता हे नक्की काय झालंय, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे का येतात, ते अधिकारवाणीने राऊतच सांगू शकतात. मी तुम्हाला सांगितलं की या यंत्रणांना देशातल्या कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे.
संजय राऊत यांची सकाळी ७ वाजल्यापासून त्यांच्या भांडूपमधल्या निवासस्थानी चौकशी सुरू आहे. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू सुनील आणि पत्नी वर्षा यांचीही चौकशी सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई त्यांच्यावर झाली आहे. यापूर्वीही अनेकदा राऊतांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी अधिवेशन तसंच इतर कारणं देत तारीख पुढे ढकलली होती. त्यामुळे सहकार्य न केल्याचा आरोप करत ईडी ही चौकशी करत आहे.