Sanjay Raut ED | ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका - CM शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Eknath Shinde
राऊतांची ED चौकशी, CM शिंदेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

ईडी कारवाईच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका - CM शिंदे

शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी सात वाजल्यापासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. भांडूपमधल्या राऊतांच्या मैत्री या निवासस्थानी ही चौकशी सुरू आहे. यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसंच ईडीच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका असा टोलाही लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या औरंगाबादमध्ये असून ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांना माध्यमांनी याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी ते म्हणाले की, चौकशी सुरू आहे ना, अटक होणार की नाही हे मला माहित नाही, मी काय तिकडचा अधिकारी नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या. ते तर म्हणालेत ना की मी काही केलेलं नाही. ते म्हणत होते,मी चौकशीला सामोरं जाणार. कर नाही, त्याला डर कशाला. काय व्हायचं ते होऊद्या. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलंय. दररोज सकाळी ९ वाजता त्यांची बाईट येत होती.

ईडीला घाबरुन आपण शिवसेना सोडणार नाही, अशा आशयाचं ट्वीट राऊतांनी चौकशीदरम्यान केलं होतं, याबद्दल विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, असं त्यांना कोणी बोलावलंय का? निमंत्रण दिलंय का? मी आज जाहीरपणे सांगतो की ईडीच्या भीतीने जर कोणी येत असाल तर कृपया आमच्याकडे येऊ नका. भाजपामध्येही नाही, आणि शिवसेनेतही नाही. हे मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. अर्जुन खोतकर असो नाहीतर आणखी कोणी असो, ईडीच्या कारवाईला घाबरुन, दडपणाखाली कोणीही पुण्याचं काम करू नका.

शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया मात्र आमदार संजय शिरसाट यांच्याकडून आली होती. या चौकशीमुळे आपल्याला आनंद झाल्याची भावना शिरसाट यांनी व्यक्त केली होती. तसंच संजय राऊतांनी शरद पवारांच्या नादाला लागून शिवसेनेचं वाटोळं केलं, असं विधानही शिरसाट यांनी केलं. शिवाय, संजय राऊत काय शिवसेना सोडणार, काही दिवसांनी उद्धव ठाकरेच त्यांना पक्षातून काढतील.