
Patra Chawl Case : संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल
मुंबई : पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर त्या आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होणार का सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
(Varsha Raut ED Enquiry)
दरम्यान, खासदार संजय राऊतांना ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली आहे. त्यानंतर ते आता ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ प्रकल्पाच्या गैरव्यवहारात त्यांचाही सामावेश आहे का? यासंबंधी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्या सध्या त्यांचे कुटुंबियांसोबत ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा: Friendship Day: मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी; मैदानाबाहेर 'मित्रप्रेम'
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून लावला जात असून विविध अकाउंटवरून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. पत्राचाळ प्रकरणातील या अवैध पैशांमधून त्यांनी अलिबागमध्ये जमीन घेतल्याचा आरोप केला जात आहे. या जमीन व्यवहारात स्वप्ना पाटकरांचाही सामावेश होता. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येत असून याआधीही त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा: अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार? मढ कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी पर्यावरण खात्याची नोटीस
काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
Web Title: Sanjay Raut Wife Varsha Raut Ed Enquiry Patra Chawl Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..