गावासाठी फक्त अर्धा कप चहाची रक्कम...

संतोष धायबर
सोमवार, 3 एप्रिल 2017

युवकांनी ठरवले तर गावचा नक्कीच विकास होऊ शकतो. अर्धा कप चहाच्या रक्कमेमधून कायापालट करता येतो, हे आमच्या ग्रुपने दाखवून दिले आहे. व्हॉट्सऍपचा केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर विधायक कामांसाठीसुद्दा चांगला वापर होऊ शकतो. 
- सागर चव्हाण, ग्रुपवरील सभासद

गावच्या मातीत घडलेले युवक..नोकरी व्यवसायासाठी परगावी स्थिरावू पाहणारे. तरीही गावची ओढ घट्ट. गावासाठी काहीतरी करायला हवे, या ध्यासातून व्हॉटस्अॅप ग्रुप तयार होतो आणि या ग्रुपच्या माध्यमातून गावासाठी फक्त 'अर्धा कप चहाची रक्कम' द्यायची ठरली. या रक्कमेतून गावात वनीकरण करायचे ठरले आणि पाहता पाहता तब्बल 2,400 वृक्षांची जोमाने वाढ झाली. 
 
नगर जिल्ह्यातील म्हसणे (सुलतानपूर) येथील ही यशकथा. सोशल नेटवर्किंगमधून विधायक कामे कशी उभी राहू शकतात, याचे उत्तम उदाहरण सांगणारी. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे युवक राजेश तरटे यांच्या संकल्पनेतून ही कथा प्रत्यक्षात आकाराला आली आहे. गावापासून दूर लंडन येथे काही काळ त्यांनी काम केले. लंडनमध्ये असतानाच गावासाठी काहीतरी केले पाहिजे ही जाणिव वाढीस लागली. गावातील युवकांना सोबत घेऊन त्यांनी व्हॉट्सऍपवर 'काळभैरवनाथ मित्र मंडळ' नावाचा ग्रुप तयार केला. 'गावासाठी काहीतरी केले पाहिजे', हे ग्रुपचे ब्रिदवाक्य अंमलात आणायचा निर्णय झाला. 
 
गावच्या यात्रेनिमित्त एकत्र जमलेल्या युवकांनी चर्चा केली. व्हॉट्सऍप ग्रुपवरील सभासदांनी सर्वप्रथम रोज गावासाठी अर्धा कप चहाची रक्कम बचत करून ती गावच्या विकासासाठी द्यायचे ठरले. प्रत्येकी सभासदांकडून 100 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत जमा होऊ लागले. गावाबाहेर राहणाऱया युवकांनी त्यामध्ये आणखी भर टाकून आर्थिक रक्कमेचा फंड तयार केला. या रक्कमेमधून जुलै 2015 मध्ये गावात 200 वृक्षांची लागवड केली. ग्रुपच्या सभासदांनी पुन्हा प्रयत्न करून ऑगस्ट 2015 मध्ये ग्रामपंचायत सामाजिक वनीकरण विभागामार्फत आणखी 2200 वृक्षांची लागवड केली. वर्षभरात 2400 वृक्षांची देखभाल करण्यात आली असून, आज ही वनराई जोमाने वाढताना दिसत आहे. 
 
गेल्या दोन वर्षांतील उन्हाळ्यात वृक्षांना पाण्याची मोठी गरज भासत होती. शासनाने सुद्धा पाणी पुरवले होते. परंतु, ते कमी पडत होते. याबाबत ग्रुपवर चर्चा झाली आणि पुन्हा रक्कम जमा करून 40 टॅंकर पाणी देऊ केले. सामाजिक वनीकरणाच्या कर्मचाऱयांनी वृक्षांची चांगली निगा राखल्याने रस्त्यांवरून जाणाऱयांना थंडगार सावली मिळू लागली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे, अशी फक्त व्हॉट्सऍपवर चर्चा न करता या ग्रुपने अमलात आणली आहे.
Web Title: santosh dhaybar wirte mhasne whatsaap group news