बालविवाहाला आता सरपंच, सदस्य, ग्रामसेवक जबाबदार! ५ वर्षांत ९३ हजार बालमृत्यू

१४ ते १६ वयाची असतानाच तिच्यावर संसाराची जबाबदारी येते आणि ती बालवयातच माता होते. त्यामुळे तिच्यासह नवजात शिशूच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. मागील अडीच वर्षांत राज्यात जवळपास तीन हजार बालविवाह (गुपचूप झालेले विवाह वगळून) रोखले आहेत. ही प्रथा कायमची बंद व्हावी म्हणून आता ज्या गावात बालविवाह झाला किंवा होत आहे, तेथील सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांचे पद रद्द व्हावे, असा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने सरकारला पाठविला आहे. त्यामुळे बालविवाहाला चाप बसेल, असा विश्वास आहे.
devendra fadanvis and rupali chakankar
devendra fadanvis and rupali chakankarsakal

सोलापूर : महिला सृष्टीची निर्माती आहे. तरीपण, बालविवाहासह इतर कारणांमुळे राज्यात दरवर्षी सहा ते आठ हजार गर्भवती मातांचा मृत्यू होतो. चिंतेची बाब म्हणजे, २०१७-१८ पासून पाच वर्षांत तब्बल ९३ हजार बालमृत्यू (वयोगट ० ते ५) झाले आहेत. मातामृत्यूमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर (एक लाखामध्ये ७० हून अधिक मृत्यू) आहे. १४ ते १६ वयाची असतानाच तिच्यावर संसाराची जबाबदारी येते आणि ती बालवयातच माता होते. त्यामुळे तिच्यासह नवजात शिशूच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. मागील अडीच वर्षांत राज्यात जवळपास तीन हजार बालविवाह (गुपचूप झालेले विवाह वगळून) रोखले आहेत. ही प्रथा कायमची बंद व्हावी म्हणून आता ज्या गावात बालविवाह झाला किंवा होत आहे, तेथील सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांचे पद रद्द व्हावे, असा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने सरकारला पाठविला आहे. त्यामुळे बालविवाहाला चाप बसेल, असा विश्वास आहे.

बालविवाह रोखण्यासाठी दोन प्रस्ताव

बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार संबंधित मुला-मुलींचे पालक, भटजी, मंगल कार्यालय यांच्यावर कारवाई होते. तरीपण, बालविवाह कमी झालेले नाहीत, हे विशेष. त्यामुळे आता कायद्यातच दुरुस्ती करून गावातील मुला-मुलींच्या बालविवाहाला तेथील सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांचे पद तत्काळ रद्द करावे किंवा तीन महिन्यांसाठी तरी रद्द करावे; जेणेकरून बालविवाहाला चाप बसेल, असा प्रस्ताव सुदृढ समाजासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सरकारला दिला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. कायद्यातील दुरुस्तीनंतर निश्चितपणे ही अनिष्ट प्रथा हद्दपार होईल, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.

बालविवाहामुळे वाढले बालमृत्यू (वर्षनिहाय प्रमाण)

  • वर्ष बालमृत्यू

  • २०१७-१८ २०,१०५

  • २०१८-१९ २०,०८४

  • २०१९-२० १९,१८५

  • २०२०-२१ १६,९५१

  • २०२१-२२ १६,७१४

  • एकूण ९३,०३९

बालविवाहाची प्रमुख कारणे

  • मुलींना घराजवळ शाळेची सोय नाही; शाळेत जायला वाहतूक सुविधा अपुरी

  • पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षणाचा भार सोसवत नाही

  • योग्य वयात त्यांना विवाह, संसाराची जाणीव नसते; प्रेमप्रकरण, मुली पळून जाण्याचे वाढले प्रमाण

  • आई-वडिलांना मुलगी ओझे वाटते; मुला-मुलींमध्ये अजूनही होतोय भेदभाव

  • जास्त वयापेक्षा कमी वयाच्या मुलींनाच मुलांकडील लोकांची अधिक पसंती

बालविवाहामुळे बरबाद होतेय ‘ती’चे आयुष्य

  • शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसतानाही बालविवाह केल्यास प्रसूतीवेळी जाऊ शकतो ‘ती’चा जीव

  • कमी वयात विवाह आणि प्रसूती झाल्यास कमी वजनाची, कमी दिवसांचे बाळ जन्मते अन्‌ शक्यतो ते बाळ आजारीच असते

  • बालिका (अल्पवयीन) मुलगी कमी वयातच बालकाला जन्म देते आणि त्यामुळे वाढले बालमृत्यूचे प्रमाण

  • अल्पवयीन मुलीने तिच्या मुलांना कितीजरी व्यवस्थित सांभाळले, तरी त्या मुलांची पूर्ण वाढ होऊन सुदृढ होत नाहीत

  • बालविवाहावेळी ‘ती’च्या कमरेची हाडे विकसित झालेली नसतात आणि प्रसूतीवेळी मग सिझेरियन करून प्रसूती करावी लागते

  • कुटुंबाची जबाबदारी, पतीची पत्नी, मुलांची आई अशी जबाबदारी पार पाडताना ‘ती’चे आयुष्य १०-२० वर्षांनी होते कमी

  • बालविवाह झालेल्या तरूणींना सामोरे जावे लागते कौटुंबिक छळाला; अनेकजणी माहेरीच

माणसाने माणसाशी माणसासम वागणे...

प्रत्येक व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार जगण्याचा, शिकण्याचा अधिकार आहे. तरीही अनेकदा पालक लहान वयातच मुलगी हुशार असतानाही कमी वयात तिचा विवाह लावून देतात. त्यांनी मुलांच्या शाळेतील ही प्रार्थना कायम ध्यानात ठेवावी, ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे... भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना’. पालकांनी मुला-मुलींना शिक्षण पूर्ण करू द्यावे, त्यांच्याशी कायम सुसंवाद ठेवून त्यांच्या अडचणी समजून वेळोवेळी मार्गदर्शन करावे. निश्चितपणे शिक्षणाच्या जोरावर ‘ती’ कुटुंबाचे नाव उंचावेल.

१७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बालविवाह

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात बालविवाह सातत्याने होतात. पण, त्यातही औरंगाबाद, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, अकोला, नागपूर, नाशिक, नंदुरबार, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या १७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बालविवाहांची नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com