सरपंचांना हवे ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

राज्यातील सरपंचांना आता ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन हवे आहे. शिवाय, आमदार- खासदार निधीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वार्ड निधी मिळावा असाही आग्रह आता पुढे आला आहे.

नाशिक : राज्यातील सरपंचांना आता ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन हवे आहे. शिवाय, आमदार- खासदार निधीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वार्ड निधी मिळावा असाही आग्रह आता पुढे आला आहे. या मागण्यांच्या जोडीलाच ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विचारमंथन व्हावे म्हणून भिगवण (जि. पुणे) येथे राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे जुलैमध्ये दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. 

पंचायत राज विकास मंचच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की ग्रामपंचायतींना 25 लाखांपर्यंतची कामे करण्याचा अधिकार सरकारने द्यायला हवा. शिवाय, राज्यातील सहा महसूल विभागांतून प्रत्येकी एक सरपंच प्रतिनिधीला विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध व्हावी.

चौदाव्या वित्त आयोगाप्रमाणे समाजकल्याण आणि इतर निधी थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च केला जावा. अशा विविध मागण्यांबाबत भिगवणच्या अधिवेशनात विचारविनिमय केला जाईल. अधिवेशनात घेतल्या जाणाऱ्या निर्णयानुसार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. प्रश्‍न मार्गी न लागल्यास वेळप्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल. 
 

Web Title: Sarpanchs need to pay as much as gramsevaks wages increases