राज्य सरकारच्या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

संभाजी महाराज हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता असा वादग्रस्त उल्लेख 'सर्व शिक्षा अभियानाच्या' समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकात छापलेल्या या मजकूराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

पुणे- संभाजी महाराज हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता असा वादग्रस्त उल्लेख राज्य सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियानाच्या' समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकात छापलेल्या या मजकूराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.  

'संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता' असा वादग्रस्त उल्लेख केल्याचे समोर आल्याने या पुस्तकावरच संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानात 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 18 वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे.

'रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

संभाजी महाराज दारूच्या नशेत होते या वाक्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. सर्व शिक्षा अभियानाकडून छत्रपती संभाजी महाराजांना मद्यपी ठरवण्याचा हा मोठा डाव असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. राज्यसरकार आणि सर्व शिक्षण अभियानांतर्गत छत्रपती संभाजी महाराजांची झालेली बदनामीचा जाब विचारण्यात येणार आहे आणि याचा शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर निषेधही नोंदवण्यात येणार आहे.

Web Title: Sarva Shiksha Abhiyan Book On Ramdas Swami Says Sambhaji Maharaj Alcoholic Spark Controversy