सोने रिफायनरीत सातारा, सांगलीकरांचा डंका 

प्रमोद सावंत
रविवार, 23 डिसेंबर 2018

मालेगाव : देशभरातील विविध सराफ व्यावसायिकांकडे मोडसाठी येणारे सोने- चांदी वितळवून ते रिफाइन व शुद्ध करण्यात सातारा, सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील गलई व्यावसायिकांचा डंका साता समुद्रापार पोचला आहे. या व्यवसायानिमित्त सुमारे एक लाख चाळीस हजारांहून अधिक व्यावसायिक काश्‍मीर ते कन्याकुमारी व आशिया खंडात अन्य देशांत स्थिरस्थावर झाले आहेत. हजारो व्यावसायिक मोडता घडविणारे मोठे सुवर्णकार (सराफ) व्यावसायिक झाले आहेत. जोखिमेच्या या कामात मराठा समाज चार शतकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. 

सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील कष्टकरी नोकरी, व्यवसायानिमित्त सर्वत्र विखुरले आहेत. सैन्य दलातही या जिल्ह्यातील तरुणांची मोठी संख्या आहे. मोडचे सोने- चांदी वितळवून शुद्ध करण्याची चारशे वर्षांपासूनची परंपरा नव्या पिढीनेही जोपासली आहे. राज्यात काही ठिकाणी अत्याधुनिक यंत्राद्वारे सोने- चांदी रिफाइन करण्याचे कारखाने सुरू झाले. मात्र या पारंपरिक तंत्रापुढे त्याचा टिकाव लागला नाही. उत्तर महाराष्ट्रात सुमारे नऊशेहून अधिक गलई व्यवसायिक असल्याचे याच व्यवसायातून प्रसिद्ध सराफ झालेले येथील शिवाजी रामचंद्र पवार ज्वेलर्सचे संचालक राजाराम ऊर्फ बाबू पवार यांनी "सकाळ' ला सांगितले. 

सामाजिक कार्याला हातभार 

उत्तर महाराष्ट्रात गलई व्यवसायातून सुवर्णकार व्यवसायात नावलौकिक असलेले पवार ज्वेलर्स, सातारकर ज्वेलर्स (मालेगाव), जगदाळे बंधू (जळगाव), केदार ज्वेलर्स, रसिका ज्वेलर्स (नाशिक), लक्ष्मी ज्वेलर्स (धुळे) अशी अनेक नावे आहेत. देशात ज्या- ज्या गावात, शहरे, महानगरात आठ ते दहा सुवर्णकार व्यावसायिक आहेत, अशा ठिकाणी किमान एक गलई व्यावसायिक हमखास आहे.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये सोने विक्री व मोडचे प्रमाण अधिक आहे. या तिन्ही राज्यात शेकडो गलई व्यावसायिक आहेत. याच व्यवसायातून उंची गाठल्यानंतर अनेकांनी आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी सातारा, सांगली जिल्ह्यातील विटा, मान, खटाव, खाणापूर, कलेढोण यासह विविध गावांमध्ये शाळा, रुग्णालय, मंदीर आदींचे बांधकाम व जिर्णोद्धाराला अर्थसाह्य केले. 

Web Title: Satara and Sangli Residents gold refineries