या कॅप्टनने विमान बनवलयं; प्रवासाचे स्वप्नही नजरेच्या टप्प्यात

राजेश पाटील
Wednesday, 19 August 2020

लवकरच उर्वरित चाचण्याही पूर्ण होऊन भारतीय बनावटीचं पहिलं विमान आपली गुणवत्ता सिद्ध करेल, असा विश्वास भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणारे कॅप्टन अमोल यादव यांनी व्यक्त केला. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : "विमान बनवलं असले तरी त्याच्या पंखांमध्ये मदत, प्रोत्साहन आणि शुभेच्छांचं बळ तुम्हीच सर्वांनी भरलंय. लवकरच उर्वरित चाचण्याही पूर्ण होऊन भारतीय बनावटीचं पहिलं विमान आपली गुणवत्ता सिद्ध करेल, असा विश्वास भारतीय बनावटीचे पहिले विमान बनविणारे कॅप्टन अमोल यादव यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य माणसाचे विमान प्रवासाचे स्वप्न अगदीच नजरेच्या टप्प्यात असताना त्याच्या पूर्ततेसाठी शासनाच्या भक्कम पाठबळाची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

धुळे विमानतळावर नुकतीच अमोल यादव यांच्या विमानाने पहिली चाचणी पूर्ण केली. ढेबेवाडी विभागातील सळवे (ता. पाटण) हे त्यांचे मूळगाव. श्री. यादव म्हणाले, "1997 पासून मी विमान तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. तिसऱ्या प्रयत्नानंतर 2009 मध्ये त्यात खऱ्या अर्थाने यश आले. सर्वसामान्य कुटुंबातील माणसासाठी हे आर्थिक धाडस खूप मोठे होते. या काळात आम्ही कुटुंबीयांनी खूप हाल सोसले. रस्त्यावर येण्यासारखी परिस्थिती आलेली असतानाही कुणीही डगमगलो नाही. अनेकांनी मदत, प्रोत्साहन व कौतुकाचे पाठबळ दिले. त्यातूनच हे स्वप्न सत्यात आले. 2016 मध्ये मेक इन इंडियामध्ये हे विमान प्रदर्शित केले. 2019 मध्ये परमिट टू फ्लाय मिळाले. नुकतीच एक चाचणी यशस्वी झाली. आणखी दोन दिवसांच्या दोन चाचण्या आहेत. त्यातील विमान दोन हजार फूट उंचीवर नेणे व एका विमानतळावरून दुसऱ्या विमान तळावर उड्डाण करणे, ही चाचणी खूप महत्त्वाची आहे. चाचणीदरम्यान पायलट व तंत्रज्ञ अशा दोनच व्यक्ती विमानात असतात. मी तयार केलेले विमान सहा आसनी व विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. भारतातील उपलब्ध धावपट्ट्यांवर ते उतरू शकते. ते थांबलेल्या ठिकाणी धावपळ करत विशिष्ट पेट्रोल पोचविणेही आवश्‍यक नाही. उपलब्ध पेट्रोलवरसुद्धा ते चालू शकेल, अशी इंजिनची रचना केली आहे.'' 

मोठ्या विमानांच्या सेवेवर मर्यादा असतात. त्यांना मोठ्या धावपट्ट्या लागतात. प्रवासी संख्या कमी झाल्यावर फायदा-तोट्याचा विचार केल्याने विमान सेवा विस्कळित होते. त्या तुलनेत लहान विमानांची सेवा किती तरी पटींनी फायदेशीर ठरते. इंग्रजी राजवटीत अशी सेवा विस्तारलेली होती. मात्र, नंतरच्या काळात छोटी विमाने गायब झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत विमान निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत शासन आणि माझ्यात करार झाला. आता त्याला गती मिळाली तर सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे आणि देशातील विमान सेवा विस्तारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी दिली. 

विमान बनविणे हे एकट्याचे काम नाही. सरकारचीही भक्कम ताकद पाठीमागे लागते. मला राज्यकर्त्यांकडे त्याबाबतीत सकारात्मकता दिसली. मात्र, ज्यांच्या हातात खरी सूत्रे आहेत, त्या सरकारी बाबूंची अनास्था अडथळे वाढवत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

विविध देशांमध्ये छोट्या प्रवासी विमानांना विशेष प्राधान्य आहे. सर्वसामान्य माणसाचे विमान प्रवासाचे स्वप्न अशाच विमानांद्वारे पूर्ण होऊ शकते. हवाई सेवा विस्तारण्याबरोबरच व देश-राज्यांच्या विकासात ही विमाने महत्त्वपूर्ण योगदान देतील. 

- कॅप्टन अमोल यादव 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

क्रेझी किया रे... हा टॅटू आर्टिस्ट ठरतोय युवकांत हिट 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara This captain built the plane; The dream of travel is also in sight