शिवरायांच्या नावावर सेनेसह राजकीय पक्षांनी फक्त अस्तित्व निर्माण केलंय; उदयनराजेंचा जोरदार प्रहार

बाळकृष्ण मधाळे
Saturday, 6 February 2021

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलंय, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला या उत्तर प्रदेशात स्थान नाही. म्हणूनच, आम्ही आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले असून या संग्रहालयाच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथे मुख्यमंत्री निवासस्थानी केले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी केली. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. जानेवारी २०१६ मध्ये या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले असून ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दिड किमी अंतरावर हे संग्रहालय उभं राहणार आहे. सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबने आग्रा येथे कैदेत ठेवले होते. पण, शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे आग्राहून सुटका केली. याचा प्रेरणादायी या संग्रहालयात मांडला जाणार आहे.

प्रतापगड, अजिंक्‍यतारा किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा; उदयनराजेंची उपराष्ट्रपतींकडे मागणी

यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सिम भक्त असून त्यांच्या स्वराजातून आजही आम्हाला मोठी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्यासारख्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे. महाराजांचा गनिमी कावा साऱ्या जगाने गौरविलेला आहे. आजही अनेक देशात या तंत्रांचा वापर केला जातो. ही अभिमानाची बाब असल्याचे योगी यांनी सांगितले. आत्तापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. मात्र, तुमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास संपूर्ण जगापुढे आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या घराण्याच्या वतीने तुमचे आभार मानतो, अशी खासदार उदयनराजेंनी आदित्यनाथांची दिलगिरी व्यक्त केली. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मिळणार चालना; आरोग्यमंत्र्यांनंतर उदयनराजेंची रेल्वेमंत्र्यांना भेट, गोयलांकडे केल्या या महत्वपूर्ण मागण्या

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं. त्याच शिवसेनेला महाराजांच्या किर्तीला साजेसं असं स्मारक महाराष्ट्रात उभारता आलं नाही. मात्र, उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्या वतीने आम्ही देऊ, असेही त्यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचा गौरव केला. तसेच सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण दिले. आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन दिले.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News MP Udayanraje Bhosale met on Chief Minister Yogi Adityanath